एसटीचे तिकीट काढण्यासाठी आता प्रवाशांना ‘मुंबई वन’ कार्डचा वापर करता येणार आहे. एसटी महामंडळाच्या तिकिटिंग प्रणालीचे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डसोबत (एनसीएमसी) एकात्मीकरण करणार असल्याचे एसटीच्या अधिकार्यांनी सांगितले. ‘मुंबई वन’ कार्ड हे मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतुकीसाठी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. आता यामध्ये लालपरीचाही समावेश होणार आहे.
मेट्रो आणि लोकलप्रमाणे एसटीचे तिकीटदेखील यूपीआय व इतर संकेतस्थळांद्वारे ऑनलाइन काढता येते. याच पार्श्वभूमीवर आता महामंडळ डिजिटल पेमेंट्सला चालना देत असून, एनसीएमसी कार्डधारकांसाठी विशेष सवलती देण्याच्या तयारीत आहे.
केंद्र सरकारच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) योजनेनुसार एसटी महामंडळ आपल्या तिकिटिंग प्रणालीचे या प्रणालीसोबत एकत्रीकरण करणार आहे. यामुळे प्रवाशांना विविध वाहतूक सेवा वापरण्यासाठी वेगवेगळ्या तिकिटांची गरज भासणार नाही. एकच कार्ड सर्वत्र चालणार असल्याने वेळ आणि त्रास वाचणार आहे.
एसटीच्या प्रवाशांची संख्या कमी होत असली तरी महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक सवलती अशा विविध योजनेत सहभागी होणार्या प्रवाशांची संख्या 15 टक्क्यांनी वाढली आहे. प्रवाशांना तिकीट खरेदी करणे अधिक सोयीस्कर व्हावे आणि प्रवासी संख्या वाढावी, यासाठी एसटी महामंडळ एनसीएमसी कार्डधारकांना आकर्षक सवलती देण्याचा विचार करत आहे.
केंद्र सरकारने सुरू केलेली एकसंध डिजिटल पेमेंट प्रणाली
एकाच कार्डवर सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी तिकीट खरेदी करता येते
एनएफसी तंत्रज्ञानावर आधारित
रिअल टाइम व ऑफलाइन व्यवहाराची सोय
रोख रकमेची गरज नाही, डिजिटल व्यवहाराला चालना