

मुंबई : मुलुंडच्या एका वयोवृद्ध जोडप्याला मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात डिजिटल अरेस्टची धमकी देऊन त्यांची 32 लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी पूर्व सायबर सेल पोलिसांनी तीन सायबर ठगांविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
72 वर्षांची तक्रारदार महिला तिच्या पतीसोबत मुलुंड येथे राहत असून तिच्या पतीचा स्वतःचा व्यवसाय आहे. गेल्या आठवड्यात त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून तो कुलाबा गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या बँकेतून अडीच कोटींचा मनी लाँड्रिंगचा व्यवसाय झाला असून त्यातील 25 लाखांची दहा टक्के रक्कम खात्यात जमा झाली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.
त्यांच्या दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी पोलीस असल्याची बतावणी करून व्हिडीओ कॉलवर संभाषण केले होते. त्यांनी त्यांना सिनिअर सिटीझन असल्याने अटक करणार नाही. मात्र ते त्यांच्या घरी डिजिटल अरेस्ट असतील. त्यांना पोलिसांकडून सहकार्य केले जाईल, असे सांगून त्यांच्या बँक खात्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. तक्रारदार महिलेसह तिच्या पतीच्या बँक खात्यात 37 लाख रुपये कॅश तर लॉकरमध्ये काही सोन्याचे दागिने असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांना काही रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगितले. त्यामुळे या महिलेचा पती दुसर्या बँकेत गेला होता. तिथे त्यांनी आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात 32 लाख 80 हजार रुपये ट्रान्स्फर केले होते.
याच दरम्यान त्यांना त्यांच्या विदेशात राहणार्या जावयाचा कॉल आला होता. यावेळी त्यांनी त्याला घडलेला प्रकार सांगितला. त्याने त्यांना त्यांची सायबर ठगाकडून फसवणूक झाल्याचे सांगून पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर सेलच्या पूर्व प्रादेशिक विभागात घडलेला प्रकार सांगून संबंधित तिन्ही सायबर ठगांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असून ज्या बँक खात्यात ही रक्कम आरटीजीएसद्वारे ट्रान्स्फर झाली होती त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढली जात आहे.