

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आर्थिक वर्ष 2025 मध्येही कंपनीकडून वेतन न घेताच काम केले आहे. सलग, पाचव्या वर्षी त्यांनी वेतन घेतलेले नाही. त्यानंतरही कुटुंबाची एकत्रित कमाई 3,322.7 कोटी रुपये आहे.
कंपनीने सादर केलेल्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. कोविड-19 पासून मुकेश अंबानी यांनी कंपनीकडून मिळणारे वेतन आणि इतर सर्व प्रकारचे भत्ते घेणे बंद केले आहे. यापूर्वी अंबानी यांनी 2009 ते 2020 या कालावधीत स्वतःहून त्यांचे वेतन वार्षिक 15 कोटी रुपयांवर स्थगित केले होते. भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाचे प्रमुख असूनही त्यांनी वेतन नाकारले आहे. त्यानंतरही मुकेश अंबानी यांची संपत्ती 103.3 अब्ज डॉलर इतकी प्रचंड आहे. फोर्ब्जने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार जगातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचे स्थान 18 वे आहे.
दरम्यान, त्यांची तीन मुले ईशा अंबानी-पिरामल, आकाश आणि अनंत अंबानी ऑक्टोबर 2023 पासून कंपनीच्या संचालक मंडळावर अकार्यकारी संचालक म्हणून काम पाहात आहेत. त्यापोटी प्रत्येकाला संचालक मंडळावरील नेमणुकीसाठी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 6 लाख आणि अडीच कोटी रुपये कमिशनपोटी मिळाले आहेत. प्रत्येकाला 2.31 कोटी रुपये पदावर काम केल्याबद्दल मिळाले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ही रक्कम 1.01 कोटी रुपये होती. नीता अंबानी अकार्यकारी संचालक पदावरून ऑगस्ट 2023 मध्ये पायउतार झाल्या. त्यावेळी त्यांना पदासाठी दोन लाख व कमिशनपोटी 97 लाख रुपये मिळत होते.
कंपनीतील कार्यकारी संचालक निखिल आर. मेसवानी आणि हितल आर. मेसवानी यांना प्रत्येकी 25 कोटी रुपयांचे वार्षिक वेतन 2024-25 मध्ये मिळाले. त्यात 7.28 कोटी रुपये वेतनापोटी, निवृत्ती लाभापोटी 44 लाख आणि 17.28 कोटी लाभांशापोटी देण्यात आले आहेत. पीएमएस प्रसाद यांना 19.96 कोटी रुपये देण्यात आले. त्यातील 19.37 कोटी वेतन आणि 0.59 कोटी रुपये निवृत्ती लाभापोटी देण्यात आले आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचा 50.33 टक्के हिस्सा अंबानी कुटुंबाकडे आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये प्रत्येक शेअरमागे 10 रुपये लाभांश जाहीर केला होता. कुटुंबाकडे 332.27 कोटी शेअर्स आहेत. त्यामुळे लाभांशापोटी कुटुंबाला 3,322.7 कोटी रुपये मिळाले.