

मुंबई : एसटीच्या आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेतील पास आता ऑनलाईन मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना घरबसल्या ऑनलाईन पास मिळवता येणार आहे.
एसटीच्या या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या ४ व ७ दिवसांच्या पाससाठी ऑनलाईन कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाईन पास काढताना प्रवाशांना आवश्यक माहिती भरल्यानंतर नियमानुसार पास उपलब्ध होणार आहे. प्रवाशाला प्राप्त झालेला पास प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात दाखवता येणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने मिळालेल्या पासवर क्यूआर कोड देण्यात येणार आहे. प्रवासाच्या वेळी वाहकाकडील ईटीआयएम मशिनद्वारे हा कोड स्कॅन केला जाईल. कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशाचे नाव, पासचा प्रकार, पासची वैधता व इतर आवश्यक माहिती ईटीआयएम मशिनवर प्रदर्शित होणार आहे. तसेच, प्रवाशाने दाखविलेल्या ओळखपत्राचीही पडताळणी करण्यात येणार असून त्यानंतरच संबंधित प्रवाशाला प्रवासाची परवानगी दिली जाईल.