

मुंबई : शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना 25,000 कोटी रुपयांच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ‘ईडी’च्या विशेष न्यायालयाने बुधवारी दोषमुक्त केले. रोहित पवार यांनी या न्यायालयात दाखल केलेला दोषमुक्तीचा अर्ज स्वीकारण्यात येऊन त्यांना या प्रकरणातून क्लीन चिट देण्यात आली. याचप्रकरणी प्राजक्त तनपुरे यांच्याविरुद्ध सुरू असलेली ‘ईडी’ची कारवाई रद्द करण्यात आली आहे.
स्व. अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांच्याविरोधात या घोटाळ्यात कोणताही आक्षेपार्ह पुरावा आढळला नाही, असा अहवाल राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिला होता. त्यानंतर, रोहित पवार यांनी दोषमुक्तीच्या अर्जावर निर्णय घेण्याची विनंती विशेष न्यायालयाला केली होती. त्यावर ‘ईडी’नेही कोणताही आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे रोहित पवार यांना या प्रकरणात न्यायालयाने निर्दोष ठरवले.
तनपुरे यांची जप्त मालमत्ता मुक्त
माजी राज्यमंत्री आणि शरद पवार राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्याविरुद्ध सुरू असलेली ‘ईडी’ची कारवाई रद्द करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध सुरू असलेली चौकशी थांबविण्यात यावी, या प्रकरणात जप्त करण्यात आलेली त्यांची मालमत्ता मुक्त करावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
तथाकथित बँक घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, असे आपण सांगत होतो. न्यायालयाने आपल्याला निर्दोष मुक्त केले आहे. सत्याला विलंब होऊ शकतो आणि त्याला त्रास दिला जाऊ शकतो; पण त्याचा पराभव होऊ शकत नाही, असे रोहित पवार म्हणाले.
राज्य बँक घोटाळाप्रकरणी ‘ईडी’कडून 2021 पासून तनपुरे यांची चौकशी सुरू होती. त्यांच्या साखर कारखान्याची मालमत्ताही जप्त करण्यात आली होती. विदर्भातील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्याच्या विक्री आणि लिलावामध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत ‘ईडी’ने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. गडकरी कारखाना प्राजक्त तनपुरे यांच्या मालकीच्या प्रसाद शुगर अँड अलाईड इन्स्ट्रूमेंटस् या कंपनीने लिलावात विकत घेतला होता. या व्यवहारात मनी लाँडरिंग झाल्याचा संशय व्यक्त करत ‘ईडी’ने नागपूरमधील 7.6 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह कारखान्याची जमीन जप्त केली होती.
भाजप नेत्यांशी चर्चा व तनपुरेंची माघार
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत आहे. त्याच्या आधी हा निकाल आला आहे. भाजप नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर तनपुरे यांनी ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते. आता तनपुरे यांच्या मागील ‘ईडी’चा ससेमिराही संपणार आहे.