

मुंबई : राज्यात लवकरच एमपीएससीद्वारे आगामी काळात मेगा भरती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. तसेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षा पद्धतीप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह (वर्णनात्मक) स्वरूपात घेण्यात येणार असून, परीक्षांचे आणि मुलाखतीचे कॅलेंडर त्यानुसार तयार केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील विद्यार्थी यूपीएससीसोबत एमपीएससीची परीक्षा देत असतात. दोन्ही परीक्षांचा पॅटर्न वेगळा असल्याने तो एकसमान करण्यात येत आहे. त्याचबरोबर एमपीएससीला अधिक सक्षम करण्यासाठी नवीन पदे सुधारित आकृतिबंधाद्वारे मंजूर करण्याची कार्यवाही सुरू आहे. यापुढे वर्ग 1, वर्ग 2 आणि वर्ग 3 ची पदभरती अधिक गतीने करण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत.
आगामी काळात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया वेगवान होण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुनर्रचना करण्यात येईल. एमपीएससीमध्ये तीन सदस्यांच्या रिक्त जागा तत्काळ भरण्याची कार्यवाही सुरू आहे. एमपीएससी आयोग स्वायत्त असला, तरी त्यास सक्षम करण्याची जबाबदारी सरकारची आहे, त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 12 नोव्हेंबर 2024 च्या पत्रान्वये 617 उमेदवारांची शासनास शिफारस केली होती. त्यातील कागदपत्रे तपासणीसाठी हजर राहिलेल्या 540 उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.
बहुसंख्य विद्यार्थ्यांचा वर्णनात्मक पद्धतीला पाठिंबा असून, काही मोजके विद्यार्थी विरोध करत आहेत. सरकारकडून आता तो मान्य केला जाणार नाही. एमपीएससीत वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब केला, तर राज्यातील विद्यार्थ्यांना यूपीएससीतही फायदा होईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.