

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आयोगाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यापुढे, एमपीएससीच्या कोणत्याही परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना आयोगाच्या ऑनलाइन प्रणालीवर आपल्या खात्याची ओळख आणि पत्ता पडताळणी (केवायसी) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 'केवायसी' प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय उमेदवाराला परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही, असे आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
बनावट उमेदवारांना रोखण्यासाठी आणि भरती प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवारांना आपली ओळख आणि पत्ता पडताळण्यासाठी चार पद्धती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत :
आधार ऑनलाइन ई-केवायसी
आधार ऑफलाइन पेपरलेस डिजिटल केवायसी
आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी
नॉन-आधार ऑफलाइन केवायसी
एमपीएससीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीवर नोंदणी करताना उमेदवाराला आपला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी नोंदवणे आवश्यक असते. आता आधार-आधारित पडताळणीसाठी, उमेदवाराचा आधार क्रमांकाशी जोडलेला (लिंक केलेला) मोबाईल क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी, मार्च २०१७ पासून उमेदवारांना त्यांच्या खात्यात आधार क्रमांक नोंदवण्याची सुविधा देण्यात आली होती. आता त्याच प्रक्रियेला अधिक सक्षम बनवून 'केवायसी'ची सक्ती करण्यात आली आहे.
या नव्या नियमामुळे केवळ पात्र आणि प्रामाणिक उमेदवारांनाच अर्ज करता येणार असून, परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांना मोठा आळा बसेल, अशी अपेक्षा आयोगाकडून व्यक्त केली जात आहे.