

मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज किनारी रस्त्यालगतचा (कोस्टल रोड) महाकाय पदपथ (विहार क्षेत्र) व रस्ता नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून 24 तास खुला होणार असून, मॉर्निंग वॉकसह मुंबईकरांना, पर्यटकांना समुद्राचे नयनरम्य दृश्य न्याहाळत या पदपथावरून सायंकाळच्या वेळी फेरफटका मारता येईल.
कोस्टल रोडलगत 5.25 किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र म्हणजेच महाकाय पदपथ साकारण्यात आला आहे. या पदपथासह चार पादचारी भुयारी मार्गांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्यासह महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोस्टल रोडच्या विहार क्षेत्रावर सायकल ट्रॅक तयार करण्यात आला असून, निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी आसनव्यवस्था व हिरवळही विकसित केली आहे. यात समुद्र किनारी वाढू शकतील, अशी झाडे लावण्यात आली आहेत. या पदपथाकडे जाण्यासाठी उभारलेल्या भुयारी पादचारी मार्गावर दिव्यांगांसाठी रॅम्प तयार करण्यात आला आहे. त्यासोबतच या सर्व ठिकाणांहून भुयारी मार्गात जाण्यासाठी पायर्या तसेच रॅम्पची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांना मरीन ड्राईव्ह नंतर दुसरा मोठा पदपथ मॉर्निंग वॉकसह दिवसभर फेरफटका मारण्यासाठी मिळणार आहे.
मुंबईचा कायापालट होत असून रस्त्यांचे जाळे विस्तारत आहे. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते तयार केले जात असून, रस्त्यांच्या दुतर्फा 70 हेक्टर क्षेत्रात उद्यान विकसित केले जात असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुंबई हे देशाचे आर्थिक इंजिन आहे. समाजातील प्रत्येक घटक मुंबईच्या विकासाठी घाम गाळत असून पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मुंबईचा चेहरामोहरा बदलत आहे. मुंबईत रस्ते विकास वेगाने सुरू असून मुंबई महानगरपालिका विकासाभिमुख प्रकल्प राबवत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.