

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे स्वामित्त्व असलेल्या मोरबे धरणातील जलसाठ्याची आजची स्थिती चिंतेदायक बनली असून, गेल्या ११ वर्षांतील तुलनात्मक आकडेवारीनुसार यंदा १६ ऑक्टोबर २०२६ रोजी धरणात सर्वात कमी जलसाठा उपलब्ध असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सध्या धरणात १३३.३० दशलक्ष घनमीटर (६९.८३ टक्के) इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. नवी मुंबई महापालिकेने २०१६ पासूनच्या मोरबे धरणातील जलसाठ्याचा संक्षिप्त आढावा जारी केला आहे.
यानुसार, २०१६ मध्ये १६ ऑक्टोबर रोजी धरणात ७१.६५ टक्के उपयुक्त जलसाठा होता. त्या तुलनेत यंदा तो ६९.८३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. २०२४ आणि २०२५ या वर्षांमध्ये याच कालावधीत धरणात अनुक्रमे ८३.६७ टक्के आणि ८१.५१ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता.
सन २०१६ मध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दररोज सरासरी ३७७ दशलक्ष लिटर (द.ल.लि.) पाण्याचा वापर केला जात होता. मात्र, वाढत्या नागरीकरणामुळे आणि लोकसंख्येत झालेल्या वाढीमुळे सध्या शहराची पाण्याची मागणी दररोज ४७० दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचली आहे.
पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय
सध्या शहराला प्रति माणसी प्रति दिन २०० लिटरप्रमाणे पाणीपुरवठा केला जात आहे. वाढती मागणी आणि धरणातील घटता साठा लक्षात घेता महापालिकेने पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
भविष्यात संभवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत शहराचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरक्षित ठेवण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
वाढत्या मागणीनुसार पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आणि योग्य नियोजनाचे आवाहनही केले जात आहे.