

मुंबई : राज्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता असली तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही. मान्सून अद्याप केरळातही दाखल झाला नसून महाराष्ट्रातील बहुतांश भागात 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. त्यामुळे शेतकर्यांनी मान्सूनपूर्व वादळी पावसाच्या आधारे पेरणीची घाई करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, यंदाच्या मान्सूनला एल निनोचा फटका बसण्याची शक्यता गृहित धरून राज्य सरकारने कृषी तसेच जलसंधारणाच्या कामाला प्राधान्य देत त्यासाठीचा ‘वॉर प्लॅन’ तयार केला आहे.
दुष्काळपूर्व सज्जता
शेतकर्यांना ‘प्रत्येक थेंब जपा’ असा संदेश देत पाणी वापराचे नियोजन करण्याचे आवाहन केले जात आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आधीच पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ लागल्याने सरकारची ही तयारी प्रत्यक्षात ‘दुष्काळपूर्व सज्जता’ सुरू केल्याचे समजते.
मान्सून आज केरळात येणार
पुणे : मान्सून तब्बल 13 दिवस श्रीलंका बेटावर मुक्कामी होता. तो रविवारी, 31 मे रोजी भारतीय किनारपट्टीच्या खूप जवळ आला. मात्र, दक्षिण किनारपट्टी ओलांडून देशात आला नाही. तो काही तासांत म्हणजे सोमवारी केरळसह दक्षिण भारतात दाखल होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मान्सूनने 31 मे रोजी दुपारी श्रीलंकेतून प्रस्थान केले असून तो सध्या उंबरठ्यावर आहे.