

Mumbai Rains
मुंबई : पुढील २ ते ३ तासांत मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घ्या, असा इशारा मंगळवारी सकाळी १२:१५ वाजता हवामान विभागाने जारी केला.
दरम्यान, पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १५ मिनिट उशिराने सुरु आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक १५ मिनिट उशिराने, तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक १० मिनिट उशिराने सुरु आहे. मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.
आज सकाळी ११.२५ वाजता मिळालेल्या अपडेटनुसार, मुंबई आणि उपनगरांत जोरदार पाऊस झाला आहे. सांताक्रूझ, जुहू येथे ४० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे इंडिगोने सोशल मीडियावर प्रवाशांसाठी ॲडव्हाजरी जारी केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, 'मुंबईत सध्या जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे विमानांच्या उड्डाणांत तात्पुरता स्वरुपाचा व्यत्यय येत आहे. जर तुम्ही आज प्रवास करत असाल, तर कृपया संभाव्य विलंब होऊ शकतो." मुंबईत सुरु असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर स्पाईस जेटनही प्रवाशांसासाठी ॲडव्हाजरी जारी केली आहे.
मुंबईसह नवी मुंबईतील सानपाडा, वाशी, ठाणे या भागांमध्येही पावसाने झोडपल्याने नागरिकांचा खोळंबा झाला आहे.
अंधेरी सबवे पाण्याखाली
मुंबईतील अंधेरी सबवे पाण्याखाली गेला असून दोन ते तीन फूट पाणी भरल्यामुळे वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
अंधेरी पोलिस आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून अंधेरी सबवे बाहेर बॅरिकेट लावून बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सबवे बंद असल्यामुळे वाहन चालक गोखले पुलाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.