मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तलावांतील पाणीसाठा घटू लागला आहे. काही दिवसापूर्वी ओसंडून वाहणार्या मोडक सागर व तानसा तलावातील पाणीसाठ्यात सुमारे 8 हजार दशलक्ष लिटर्स इतकी घट झाली आहे.
तलाव क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. तानसा 9 जुलैला व मोडक सागर 23 जुलैला ओसंडून वाहू लागले होते. त्यामुळे या दोन्ही तलावातील पाणीसाठा 100 टक्केवर पोहचला होता. पण गेल्या काही दिवसांपासून तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे या दोन्ही तलावातील पाणीसाठा 3 ते 5 टक्के इतकी घट झाली आहे.
त्यामुळे मोडक सागर तलावातील पाणीसाठा 1 लाख 23 हजार तर तानसा तलावातील पाणीसाठा 1 लाख 42 हजार दशलक्ष लिटर्सवर पोहचला आहे. मध्य वैतरणा तलावातील पाणीसाठा घटल्यामुळे 8 ऑगस्टला या धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणार्या सात तलावातील पाणीसाठा 89.17 टक्केवर पोहचला आहे. गेल्या वर्षी तुलनेत हा पाणीसाठा 3 टक्केने कमी असून गेल्या वेळी 11 ऑगस्टपर्यंत 92.20 टक्के इतका पाणीसाठा झाला होता.
अजून तलाव भरण्यासाठी 1 लाख 57 हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. पावसाळ्याला अजून दीड महिन्याचा कालावधी असून ऑगस्ट अखेर व सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत सर्व तलाव 100 टक्के भरतील, असा विश्वास पालिकेच्या जल अभियंता विभागाने व्यक्त केला.
अशी झाली घट
मोडक सागर - (पाणीसाठा दशलक्ष लिटरमध्ये)
क्षमता - 1,28,925
सध्याचा पाणीसाठा - 1,23,417
तानसा
क्षमता - 1,45,080
सध्याचा पाणीसाठा - 1,42,063
बारवीत 96% पाणीसाठा
ठाणे जिल्ह्यातील महापालिका , नगरपालिका, एमाआयडीसी व नवी मुंबई पालिका हद्दीतील झोपडपट्टी भागाला पाणीपुरवठा करणार्या बारवी धरणातील पाणीसाठाही 96 टक्केवर अडकला आहे. गेल्या वर्षी धरण 9 ऑग्स्ट रोजी भरले होते. या धरण पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 1993 मिमी पावसाची नोद झाली असून धरणात 339.840 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झाला आहे.