

मुंबई : ठाणे-भाईंदर दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या निविदा रद्द केल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘एल अॅण्ड टी’ला पत्र लिहून त्यांनी सादर केलेल्या निविदेचा आर्थिक तपशील पाठवण्याचे आवाहन केले होते. कंपनीला देण्यात आलेली 7 दिवसांची मुदत गुरुवारी संपली असून अद्याप त्यांनी एमएमआरडीएला प्रतिसाद दिलेला नाही.
या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने निविदा प्रक्रिया राबवली होती. यात ‘एल अॅण्ड टी’ या कंपनीला असंवादी (नॉन-रिस्पॉन्सिव्ह) ठरवण्यात आले होते. आर्थिक निविदा खुली झाल्यानंतर ‘मेघा इंजिनिअरिंग’ची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली. दरम्यान ‘एल अॅण्ड टी’ कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती.
सर्वाोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही कंपनीला दिलासा मिळाला नाही; मात्र आपली निविदा 3 हजार कोटींनी कमी असल्याचा दावा कंपनीने केला होता. याच पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने जुनी निविदा रद्द केली व नवीन निविदा काढण्याचे जाहीर केले. तसेच नवीन निविदा 3 हजार कोटी रुपयांनी कमी असेल असेही म्हटले होते. ’एल अॅण्ड टी’ने सादर केलेल्या निविदेचा सविस्तर तपशील एमएमआरडीएने मागवला. यासाठी कंपनीला 7 दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतरही कंपनीकडून काहीही प्रतिसाद देण्यात आला नाही.
12 जून 2025 : चेन्नई मेट्रो - दोन आय-गर्डर कोसळले, एक ठार. 1 कोटी दंड
3 जून 2025 : हुबळी - पाईपलाइन कामादरम्यान दरड कोसळली, एक मृत
6 नोव्हेंबर 2024 : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन- बांधकामाचा अपघात, तिघांचा मृत्यू
29 मे 2024 : वसई (पाणी प्रकल्प)- खोदकामात ट्रेंच कोसळल्याने यंत्र चालक मृत
6 मार्च 2024 : कोयंबतूर बायपास - दोन महिन्यांत 21 अपघात, 4 मृत
13 फेब्रुवारी 2024 : कोयंबतूर बायपास - वर्षभरात 120 मृत्यूंची नोंद
4 सप्टेंबर 2023 : चेन्नई - कामगार मृत्यू प्रकरणात दंड
8 फेब्रुवारी 2022 : नवी मुंबई - लोखंडी अँगल कोसळून कामगाराचा मृत्यू
12 मार्च 2020 : ऑफशोअर क्रेन अपघात - दोन जखमी
‘एल अॅण्ड टी’ने बांधलेले कालेश्वर धरण कोसळल्याच्या कारणास्तव एमएमआरडीएने कंपनीला अपात्र ठरवले; मात्र आपली निविदा सर्वात कमी असल्याचा दावा कंपनीने केला होता. त्याचे तपशील कंपनीने पुरवले असते तर सुधारित निविदेची किंमत 3 हजार कोटींनी कमी झाली असती.
विहीत मुदतीत कंपनीने तपशील पुरवलेले नाहीत. त्यामुळे आता सुधारित निविदेची किंमत कमी केली जाणार की नाही, याबाबत स्पष्टता नाही. एमएमआरडीए अद्याप ’एल अॅण्ड टी’च्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. याबाबतचा निर्णय आता पुढील आठवड्यातच होईल.
दुहेरी बोगदा : 5 किमी
उन्नत मार्ग : 9.8 किमी
दोन्ही प्रकल्पांच्या निविदेची
मूळ किंमत : 14 हजार कोटी
एल अॅण्ड टी बोगदा
निविदा : 6,498 कोटी
एल अॅण्ड टी उन्नत रस्ता
निविदा : 5,554 कोटी
मेघा इंजिनिअरिंग बोगदा
निविदा: 6,163 कोटी
मेघा इंजिनिअरिंग उन्नत रस्ता निविदा : 9,019 कोटी