मुंबई : मिठी नदीतील गाळ काढण्याच्या 65 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मुंबई आठ ठिकाणी केलेल्या छापेमारीत 47 कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता गोठवण्यात आल्याची माहिती शनिवारी ईडीने दिली. त्यात बँक खाती, मुदत ठेवी, डीमॅट खाती यांचा समावेश आहे. यापूर्वी ईडीने याप्रकरणी 6 जून रोजी 18 ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर अभिनेता डिनो मोरिया व त्याच्या भावाची चौकशी केली होती.
महापालिकेने नियुक्त केलेले कंत्राटदार मे. अॅक्यूट डिझाईन्स, मे. कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, मे. निखिल कन्स्ट्रक्शन कंपनी, मे. एन. ए. कन्स्ट्रक्शन प्रा. लि., मे. जे. आर. एस. इन्फ्रास्ट्रक्चर, तसेच मुंबई महानगरपालिकेचे उपमुख्य अभियंता प्रशांत कृष्णा तायशेट्टे (निवृत्त) यांच्या संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. ईडीच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यांदरम्यान अनेक आक्षेपार्ह दस्तऐवज, डिजिटल उपकरणे आणि संशयास्पद स्थावर मालमत्तेच्या व्यवहारांच्या नोंदी जप्त करण्यात आल्या असून त्याची तपासणी सुरू आहे.
तपासात ईडीला मिळालेल्या माहितीनुसार, मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कंत्राटाच्या निविदांमध्ये अनेक अनियमितता आढळल्या आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, कंत्राटदारांनी याबाबत बनावट कागदपत्रे सादर केली. त्यात सामंजस्य करार व बनावट ना हरकत प्रमाणपत्रांचा समावेश असल्याचा आरोप आहे. याशिवाय, महापालिकेच्या काही अधिकार्यांनी वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप असून त्याबाबत ईडी तपास करीत आहे.
मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कंत्राटातील 65 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी सात हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. अटक आरोपी केतन कदम व जय जोशी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 15 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.