

मुंबई ः अनुपमा गुंडे
कोरोना महामारीतील विधवा महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने मिशन वात्सल्य समित्या स्थापन केल्या होत्या. महामारी नियंत्रणात आल्यानंतर या समित्या निष्क्रिय झाल्या. समित्यांच्या नावातील कोरोना शब्द काढून त्या जागी ‘एकल महिला’ शब्द टाकून या समित्या पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय होऊन तीन महिने उलटले, मात्र सचिवांच्या टेबलावर ही फाईल तशीच पडून असल्याचे विदारक चित्र पुढे आले आहे.
लालफितीच्या तावडीतून या फाईलीची सुटका झाली आणि ‘एकल महिला मिशन वात्सल्य समित्या’ सक्रिय झाल्यास राज्यभरातील सुमारे 80 लाख एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळू शकेल. हा मुद्दा एकल महिलांसाठी लढणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी पुढे आणला. त्यावर 3 मे रोजी मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासोबत बैठक झाली. त्यात ही बिनखर्चिक ,पण महत्त्वाची समिती कार्यरत करण्याला त्यांनी मान्यता दिली होती.
प्रशासकीय यंत्रणेला केवळ फक्त शुद्धिपत्र टाकून कोरोनाऐवजी सर्व एकल महिला इतका बदल करावयाचा होता. आज 3 महिने झाले. तरीही फाईल हळूहळू फिरत सचिवांकडे गेली व महिना झाला तरी सचिवांकडे पडून आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या अधिकार्यांना 60 पेक्षा जास्त फोन केले, पत्रव्यवहार केला पण सूत्रे काही हलत नाही, अशी खंत हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
एकल महिला समिती स्थापन झाल्यावर रेशनकार्ड,विधवा पेन्शन, विविध दाखले,विविध कल्याणकारी योजनांचे लाभ महिलांना मिळतील. शासकीय कामांसाठी लागणारी कागदपत्रे मिळविण्यात या महिलांना अडचणी येतात, त्यांच्या शासकीय कामातील अज्ञानाचा फायदा दलाल घेतात, त्यांना नाडतात, ही समिती कार्यरत झाल्यास लाखो एकल महिलांना त्याचा लाभ मिळू शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
विशेष म्हणजे कोरोना काळात हेरंब कुलकर्णी यांनी साऊ एकल महिला समिती स्थापन करून या महिलांचे प्रश्न राज्य सरकारपुढे मांडले व त्याला प्रतिसाद म्हणून तत्कालीन राज्य सरकारने कोरोना काळातील विधवा महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुकापातळीवर मिशन वात्सल्य समिती स्थापन केल्या, मात्र कोरोनाची महामारी गेली असली तरी मिशन वात्सल्य समितीच्या नावातील कोरोना मात्र घालवण्यास प्रशासन इच्छुक नाही, असे दिसते.
लाडक्या बहिणी योजनेच्या भाराने वाकलेल्या सरकारवर ही समितीमुळे आर्थिक बोजा वाढणार असल्याचे तसेच योजनेसाठी केंद्र सरकारच्या निधीच्या कुबड्या लागतील असा अपप्रचार केल्या जात असल्याने ही समिती अजून अस्तित्वात येत नाही, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात वात्सल्य समित्या एकल महिलांसाठी सक्रिय झाल्यास त्या शासकीय योजना आणि एकल महिला यांच्यातील फक्त दुवा ठरणार असून, या समित्यांचा कोणताही बोजा सरकारवर पडणार नाही हे आधीच स्पष्ट झाले असल्याचे हेरंब कुलकर्णी म्हणाले.