

मुंबई : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आता विविध मंत्र्यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारत आढावा बैठकांना सुरुवात केली आहे. मंगळवारी मंत्री पंकजा मुंडे, संजय सावकारे, नितेश राणे, प्रताप सरनाईक आदी नेत्यांनी आपल्या खात्याची सूत्रे स्वीकारली. यावेळी संबंधित मंत्र्यांनी अधिकार्यांना विविध योजनांच्या कार्यवाहीविषयी आदेश देऊन सूचनाही केल्या. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर स्वागत-सत्कारासाठी मतदारसंघांत रवाना झालेले नवे मंत्रीही अद्याप मंत्रालयात परतायचे आहेत. त्यामुळे आतापर्यंत निवडक मंत्र्यांनीच आपल्या खात्यांचा परभार स्वीकारला आहे. अनेक मंत्री नव्या वर्षातच आपला पदभार स्वीकारणार असल्याचे समजते.
मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन खात्याचा पदभार स्वीकारला. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकार्यांसोबत आढावा बैठक घेत राज्यातील पर्यावरण विभागातील कामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. वस्त्रोद्योग विभागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीला चालना देऊन राज्याचा सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये हा विभाग मोलाचा वाटा उचलेल, असे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी सांगितले. वस्त्रोद्योग मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सावकारे यांनी मंत्रालयात विभागाची आढावा बैठक घेतली. वस्त्रोद्योग विभागातील विविध योजनांना गती द्यावी अशा सूचना मंत्री सावकारे यांनी यावेळी केली.
मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे खात्याचा पदभार स्वीकारला. यावेळी मत्स्य व बंदरे विभागातील अधिकार्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला. सागरी सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेबाबत आपण बरीच खबरदारी घेतली. मात्र, आताही काही जिहादी लोकांच्या कारवाया सागरी किनार्यावर सुरू असल्याचे दिसते. या आघाडीवर काय करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
परिवहन खात्यात सुसूत्रता आणण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागले तरी चालतील. खात्याचे एक व्हिजन असायला हवे. त्याद़ृष्टीने काम करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर दिली. सोबतच रस्ते अपघातांवर चिंता व्यक्त करत याबाबत सर्वंकष धोरण तयार करणार असल्याचेही ते म्हणाले.