

मुंबई : ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना अडकविण्यासाठी कट करणारी मंडळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांच्या सतत संपर्कात होती. गोरे यांना राजकारणातून उठवण्याचा हा प्रकार होता. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे आरोपींच्या सतत संपर्कात होते. या प्रकरणातील आरोपींकडून सर्व पुरावे गोळा करण्यात आल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. कोणतीही घटना घडल्यानंतर आरोपीला माझाच सगासोयरा बनविण्याचा उद्योग सुरू होतो. मात्र, देशाचे संविधान हे सगे आणि राज्यातील 13 कोटी जनता माझे सोयरे आहेत. याच भावनेतून महाराष्ट्र निर्माणाचे काम करत राहणार असल्याचा निश्चय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
विरोधी पक्षांनी नियम 292 अन्वये मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांनी उपस्थित केलेले आरोप खोडून काढले. जवळपास दीड तासाच्या आपल्या उत्तरात मुख्यमंत्री फडणवीसांनी कविता, शेरोशायरी आणि राजकीय टोलेबाजी करत विरोधकांचा समाचार घेतला.
मंत्री गोरे यांना अडकविण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात संबंधित महिला, तुषार खरात आणि अनिल सुभेदार यांना अटक झाली आहे. या सगळ्यांनी मिळून जो कट रचला त्याचे सगळे पुरावे सापडले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक यांच्याशी थेट संपर्कात होते. प्रभाकरराव देशमुख हे या तिन्ही आरोपींशी 100 वेळा बोलले आहेत. त्याहीपेक्षा सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे तुषार खरात यांना कॉल झाले आहेत. तुषार खरात यांनी जयकुमार गोरेंविरोधात तयार केलेले व्हिडीओ सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवले आहेत. आता याची चौकशी होईल.
आपण राजकीय शत्रू नाही, तर राजकीय विरोधक आहोत. त्यामुळे अशाप्रकारे कुणाला जीवनातून उठवून टाकण्याचा प्रयत्न होत असल्यास ते चुकीचे आहे. तुषार खरात नावाचा कथित यूट्यूबर आणि काही लोकांचे संबंध यामध्ये पाहायला मिळाले. या प्रकरणातील महिला, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातली आहे अशाप्रकारचा खोटा प्रचार करण्यात आला. त्याविरोधातही तक्रार करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
गोरे यांच्याविरोधात तयार केलेले व्हिडीओ आरोपींनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवले असून, त्या तिघांमध्ये अनेक फोन कॉल झाले. राजकारण करताना कुणाला जीवनातून उठविण्याच्या हेतूने राजकारण होत असल्यास ते योग्य नाही. 2016 मध्ये मंत्री जयकुमार गोरे यांच्यासंदर्भातील केस दाखल झाली आणि ती 2019 मध्ये संपली. तेव्हा ते आमच्या म्हणजे भाजपसोबत नव्हते. त्यानंतर अचानक हे प्रकरण उकरून काढण्यात आले. यात लाचेची मागणी झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. पैसे घेताना आरोपीला अटक करण्यात आली. त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार होता, असे ते म्हणाले.
गृहमंत्री म्हणून प्रत्येक गोष्टीचा थेट संबंध माझ्याशी जोडला जातो. 2022 ते 2024 तुम्ही मला लक्ष्य केले. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी मला लक्ष्य केले. परिणाम असा झाला की, लोकांनी आधीपेक्षा प्रचंड बहुमत आम्हाला दिले. माझा सगा संविधान आणि सोयरे राज्यातील 13 कोटी जनता आहे. त्यामुळे न्यायदानाचा तराजू आपले काम करेल. समाजाचा जो शत्रू असेल त्याला मी सोडणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या प्रकरणातील संबंधित महिला आणि पत्रकार तुषार खरात यांना मी ओळखते. त्यांच्याशी माझे बोलणे झाले असले, तरी मी कोणालाही मेसेज फॉरवर्ड केलेले नाहीत. हवे तर तुम्ही माझा फोन तपासू शकता, असे प्रतिआव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. तसेच, आमदार रोहित पवार यांनी, त्या महिलेला न्याय मिळावा यासाठी एक ते दोन फोन केले असतील, असे म्हटले आहे. तसेच, हा विषय पारदर्शकपणे हाताळला गेला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.