

मुंबई : शासकीय नोकरीतील काही पदे ही सरसेवा पद्धतीने भरली जात होती. यासाठी पुर्वी स्पर्धापरीक्षेप्रमाणे नियम नव्हते पण आता स्पर्धा परीक्षेप्रमाणेच सरळसेवा भरतीप्रक्रियेकरीता किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) घेतला आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
शासकीय नोकरीसाठी सरळसेवा भरती होत असेल तर आता उमेदवारांना निवड प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी ठराविक पर्सेंटाईल गुण मिळवणे बंधनकारक राहणार आहे. हा निर्णय भरतीप्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गुणवत्ताप्रधान करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. यामुळे नियुक्त करण्यात येणाऱ्या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड होणार आहे. उमेदवाराच्या निवडीसाठी उच्च दर्जाचे निकष निश्चित होणार आहेत. याबाबत २३ जून २०२५ रोजी MPSC च्या संकेतस्थळावर अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
पर्सेंटाईल हे उमेदवाराच्या कामगिरीचे सापेक्ष मापन आहे, जे परिक्षेतील इतर उमेदवारांच्या तुलनेत किती चांगली कामगिरी केली हे दर्शवते. उदाहरणार्थ, 90 पर्सेंटाईल म्हणजे उमेदवाराने 90% उमेदवारांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. MPSC मध्ये, सरळसेवा भरतीसाठी उमेदवारांना ठराविक किमान पर्सेंटाईल गुण मिळवणे आवश्यक आहे, ज्यामुळे केवळ उच्च गुणवत्तेचे उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतात.
यापूर्वी केवळ राज्यसेवच्या स्पर्धा परिक्षेत होणाऱ्या भरतीसाठी पर्सेटाईंलचे गुण ग्राह्य धरले जात होते. या पद्धतीमुळे स्पर्धा परिक्षेतून योग्य उमेदवाराची नियुक्ती होत होती. पर्सेंटाइल चा एक निकष म्हणून केला जातो, जिथे निवड होणार्या पदासाठी जास्त पर्सेंटाइल असलेले उमेदवार निवडले जातात.
यापूर्वी सरळसेवा भरतीमध्ये लेखी परिक्षा व मुलाखत हे दोनच महत्वाचे टप्पे होते. पण सध्या कोणत्याही पदासाठी जाहीरात प्रसिद्ध झाल्यास लाखोंने अर्ज येतात.पण आता पर्सेंटाईलच्या नियमामुळे निवडप्रक्रियेचे निकष अधिक कठीण होतील. त्यामुळे चाळणीतून अधिक सक्षम उमेदवार निवडला जाईल. लेखी परिक्षेसाठी पर्सेंटाईल अर्हतामान प्रामुख्याने लेखी परिक्षेसाठी लागू होईल. परीक्षेच्या स्वरूपानुसार आणि प्रवर्गानुसार पर्सेंटाईलमध्ये बदल होणार आहे.