civic polls benefit for migrants : चाकरमान्यांका महापालिका निवडणूक फळली!

23 व 24 ऑगस्टला भाजपा कोकणसाठी 500 एसटी सोडणार
civic polls benefit for migrants
चाकरमान्यांका महापालिका निवडणूक फळली!pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे आरक्षण अवघ्या एका मिनिटात हाउसफुल्ल झाल्याने चाकरमानी थोडे निराश होते. मात्र, मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक त्यांच्या मदतीला धावून आली आहे. राजकीय पक्षांनी हव्या तेवढ्या बस कोकणात सोडण्याचे ठरवले आहे. यात भाजपने आघाडी घेतली असून 23 व 24 ऑगस्टला सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी मुंबईतून 500 एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गणपतीसाठी दरवर्षी सर्वच राजकीय पक्षांकडून कोकणात काही एसटी बस सोडण्यात येतात. मात्र यावेळी मुंबई महानगरपालिका निवडणूक असल्यामुळे बस सोडण्यात येणार असल्याचे समजते. यात भाजपा आघाडीवर आहे. भाजपाने संपूर्ण मुंबईतून विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात गिरगाव, ताडदेव, वरळी, लोअर परेल, परळ, लालबाग, शिवडी, नायगाव, वडाळा, चेंबूर, वांद्रे पूर्व, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मालाड, चारकोप, गोराई, घाटकोपर, भांडुप, मुलुंड आदी भागांचा समावेश आहे.

भाजपाने सुरुवातीला 500 बसचे नियोजन केले असून या बस उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाला पत्रही देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बस कमी पडल्यास अजून बस मिळाव्यात यासाठीही एसटी महामंडळाला आगाऊ विनंती करण्यात आली आहे. अन्य राजकीय पक्षांकडूनही एसटीसह खासगी बस सोडल्या जाणार असल्याचे समजते. यात शिवसेना (शिंदे गट) व शिवसेना (ठाकरे गट) यांचा समावेश आहे.

मोदी एक्स्प्रेसही धावणार

दरवर्षीप्रमाणे गणपतीला दादर येथून कोकण रेल्वे मार्गावर मोदी एक्स्प्रेसही धावणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा हा उपक्रम राबवतात. या गाडीचा प्रवास मोफत असला तरी याचे आगाऊ आरक्षण चाकरमान्यांना करता येणार आहे.

तालुका व प्रमुख गावांमध्ये विशेष बस

मुंबईतून सोडण्यात येणार्‍या एसटी बस सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यापर्यंत चालवण्यात येणार आहेत. यात एका गावात बसमध्ये मावतील एवढे प्रवासी मिळाल्यास ती बस त्या गावापर्यंत चालवण्यात येणार आहे. त्यामुळे थेट गावापासून जवळच चाकरमान्यांना पोहचता येणार आहे.

प्रवासात अल्पोपाहार व पाणी मिळणार

भाजपाकडून सोडण्यात येणार्‍या विशेष एसटी बस व मोदी एक्सप्रेसमध्ये अल्पोपाहार व पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांना स्वतःचे पैसे खर्च करून प्रवासात खाद्यपदार्थ घ्यावे लागणार नाहीत.

गणपतीत एसटी बस चालवण्याची संकल्पना जुनीच गणेश चतुर्थीला चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जास्तीत जास्त एसटी बस चालवण्याची संकल्पना जुनीच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपा गणपतीला विशेष बस चालवते. केवळ चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहेत. महापालिका निवडणुकीचा या विशेष बसशी काही संबंध नाही.

सुहास आडीवरेकर, अध्यक्ष, कोकण विकास मोर्चा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news