

मुंबई: Microsoft Jobs | पवई येथे असलेल्या नॅशनल इन्स्टिट्युट फॉर ट्रेनिंग इन इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंगच्या (निती) जागी सुरू झालेल्या आयआयएम मुंबईच्या २०२५ चा प्लेसमेंट अहवाल जाहीर झाला आहे. या अहवालानुसार गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सर्वच्या सर्व ४८० विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांनी नोकऱ्या देऊ केल्या. यात विद्यार्थ्यांना सरासरी ३४ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज प्राप्त झाले असून १० टक्के विद्यार्थ्यांना ४७.५० लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे. यंदा मायक्रोसॉफ्टने दोन विद्यार्थ्यांना सर्वाधिक ५४ लाखांचे पॅकेज मिळाल्याची माहिती बुधवारी (दि.२६) संस्थेने दिली.
नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग (नीटी) संस्थेचे 'इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये (आयआयएम) रूपांतर करण्यात आले आहे. मुंबईला देशातील २१वे आयआयएम झाले आहे. याच दोन वर्षापूर्वी झालेल्या आयआयएम यंदाची प्लेसमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्लेसमेंटमध्ये यंदा सर्वाधिक नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांमध्ये ॲक्सेंचर कंपनीचा समावेश आहे.
ॲक्सेंचरने आयआयएम मुंबईतीली ४१ विद्यार्थ्यांना ४५.३७ लाख वार्षिक उत्पन्नाचे पॅकेज देत नोकरी देऊ केली आहे. त्याशिवाय पीडब्ल्यूसी इंडिया (१८ विद्यार्थी), ब्लिंकइट (१४ विद्यार्थी) आणि पीडब्ल्यूसी युएस ॲडव्हायसरी (१० विद्यार्थी) यांनीही त्या खालोखाल विद्यार्थ्यांना नोकरी देऊ केली. मायक्रोसॉफ्टने ५४ लाख रुपये प्रतिवर्ष एवढे पॅकेज दिले तर दुबईतील लँडमार्क या कंपनीने दोन विद्यार्थ्यांना वार्षिक ३५ लाख रुपयांचे पॅकेज देत परदेशी नोकरीची संधी दिली आहे.
प्लेसमेंट मोहिमेत यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा १८ कंपन्या नव्याने सहभागी झाल्या. गेल्या वर्षी १८० कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभाग घेतला होता. यंदा ही संख्या १९८ एवढी होती. यंदा ४८० विद्यार्थी या प्रक्रियेत सहभागी झाले. त्यात ३७७ विद्यार्थी आणि १०३ विद्यार्थिनींचा सहभाग होता. या ४८० पैकी सर्वोत्कृष्ट १० टक्के विद्यार्थ्यांना सरासरी ४७.५ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले. त्यानंतरच्या २० टक्के विद्यार्थ्यांना वार्षिक ४१.२ लाख रुपयांच्या नोकरीसाठी विचारणा झाली. तर २४० विद्यार्थ्यांना किमान ३४.१ लाख रुपयांचे सरासरी पॅकेज मिळाल्याची माहिती देण्यात आली.
ॲक्सेंचर, मायक्रोसॉफ्ट, प्राक्सिस ग्लोबल अलायन्स, व्होडाफोन आयडिया, अल्वारेझ अँड मार्शल, वर्कडे, झेडएस, ब्लिंकइट, ओएनजीसी, आद कंपन्यांचा सहभाग होता तर फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील कंपन्यांनी दिलेल्या नोकऱ्यांमध्ये १३० टक्क्यांची वाढ झाली असून तब्बल ८० विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली. रिटेल आणि ई-कॉमर्स क्षेत्रात ६५ विद्यार्थ्यांनी नोकरी मिळवली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ ४७.७३ टक्के एवढी आहे. त्याशिवाय कन्सल्टिंग क्षेत्रात २८.९३ टक्के जास्त विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. तसेच बँकिंग आणि फायनान्स इंडस्ट्रीत ५० विद्यार्थ्यांनी नोकऱ्या मिळवल्या आहेत.