

मुंबई : MHT CET 2025 Registration | शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये होणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे. त्यानंतर आता अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषध निर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या एमएचटी-सीईटीची (MHT CET 2025) विद्यार्थी नोंदणीची प्रक्रियाही सुरू केली असून अर्ज भरण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
सीईटी सेलच्या नियोजानुसार, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषध निर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची एमएचटी सीईटी ९ ते २७ एप्रिल या कालावधीत घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठीची विद्यार्थ्यांना ३० डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. विलंब शुल्कासह १६ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी, तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी २३ फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांचे ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले. (MHT CET 2025)