

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे आमदार निधी, शासन निधीतून करण्यात येणाऱ्या कामांसाठी सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात २७११.९५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई इमा इमारत दुस्ती व पुनर्रचना मंडळाअंतर्गत उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी तसेच पीएमजीपी, संक्रमण गाळे व पुनर्रचित इमारतींच्या दुरुस्ती व देखभालीसाठी ६६१.७३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत २०२६-२७ या वर्षात एकूण १३ हजार १२ सदनिकांचे बांधकाम केले जाणार आहे. यासाठी म्हाडाच्या अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी १०५८५.१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
म्हाडाचा सन २०२५-२६ या वित्तीय वर्षाकरता सुधारित व सन २०२६-२०२७ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या सन २०२५-२०२६ या वित्तीय वर्षाकरिता १२३९९.२२ कोटी रुपयांच्या सुधारित व सन २०२६-२७ च्या १७४३०.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात विविध उत्पन्न गटातील २ हजार ५३८ सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी ६७४७.४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोकण मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील ५ हजार ११२ सदनिकांची उभारणी करण्याचे उद्दिष्ट आहे.
यासाठी अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी १४९७.६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील ६६५ सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी ६६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नागपूर मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील २००८ सदनिकांसाठी १२०६.१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या १४८३ सदनिकांसाठी २५८.३२ कोटी रुपये, नाशिक मंडळाअंतर्गत २३७ सदनिका बांधण्यासाठी १५१.५७ कोटी रुपये, अमरावती मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटांतील ९६९ सदनिकांसाठी ५९.९८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.