

मुंबई : स्वस्तात म्हाडाचा फ्लॅट देण्याच्या आमिषाने एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणूक करणार्या सतीश सुरेशराव जाधव आणि महादेव पंढरीनाथ बोधले दोन वॉण्टेड आरोपींना मालाड पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात त्यांचे दोन सहकारी सचिन सुरेश धुरी आणि योगेश पांडुरंग पोटे हे सहआरोपी आहेत. या दोघांनी तक्रारदार व्यापार्याला म्हाडाच्या फ्लॅटच्या नावाने एक कोटींना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
फसवणुकीच्या याच गुन्ह्यात सतीश आणि महादेव सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी सुरु आहे. यातील तक्रारदार व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. त्यांचे काळबादेवी येथे ज्वेलर्सचे दुकान होते. पाच वर्षांपूर्वी त्यांना आरोंपींनी म्हाडाचे फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष दाखविले होते. परळ आणि दादर परिसरातील फ्लॅटसाठी त्यांनी त्यांच्याकडून एक कोटी दोन लाख रुपये घेतले होते. मात्र त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. चौघेही त्यांना टाळण्यचा प्रयत्न करत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली. यावेळी आरोपींनी त्यांना एक धनादेश दिला. मात्र तो बँकेत न वटता परत आला. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी चारही आरोपींविरुद्ध मालाड पोलिसांत तक्रार केली.