

मुंबई : भुयारी मेट्रो मार्गिकेच्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात 26 मे रोजी पावसाचे पाणी शिरून बरेच नुकसान झाले होते. प्रवासी वाहतूकही थांबवावी लागली होती. याप्रकरणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने डोगस-सोमा जेव्ही या कंत्राटदार कंपनीला 10 लाखांचा दंड ठोठावला आहे.
अत्रे चौक मेट्रो स्थानकात पावसाचे पाणी शिरल्याने स्थानकाच्या बांधकामाचे काही प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच प्रवासी वाहतूक थांबल्याने प्रवाशांचीही गैरसोय झाली होती व मेट्रो प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागले होते. याप्रकरणी त्वरित चौकशी करण्यात आली व निष्काळजीपणा आणि नियोजनातील त्रुटी यांसाठी कंत्राटदार कंपनी डोगस-सोमा जेव्ही यांना दोषी ठरवत 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरसीएलकडून ही माहिती मिळवली आहे.
स्थानकाच्या कॉन्कोर्स लेव्हलमध्ये पाणी शिरले होते. ही घटना मुख्यत्वे बी 2 एंट्री/एक्झिट इंटरफेसवर बसवलेल्या तात्पुरत्या फायर बॅरियर सिमेंट प्रीकास्ट पॅनेल वॉलमध्ये बिघाड झाल्यामुळे घडली. बॅरियर फुटल्यामुळे पावसाचे पाणी आणि कचरा स्थानकात पोहोचला. यामुळे चिखल साचला आणि पाण्याचा प्रवाह प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स, अंडर क्रॉफ्ट लेव्हल, एएफसी सिस्टम, सिग्नलिंग, टेलिकॉम, इलेक्ट्रिकल उपकरणे आणि कंट्रोल रूमपर्यंत पोहोचला. या पाण्यामुळे स्थानकातील सजावटीचे नुकसान झाले आणि प्रवासी सुविधांवर प्रतिकूल परिणाम झाला. त्यामुळे तत्काळ सेवा बंद करावी लागली, अशी माहिती कंपनीला पाठवण्यात आलेल्या नोटीशीत देण्यात आली आहे.
प्राथमिक तपास अहवालानुसार, कंत्राटदार कंपनीने पूर्वी ईई-बी3 येथे एक समर्पित डिवॉटरिंग सिस्टीम बसवलेली होती. यामध्ये अनेक पंप होते, जे नियमित पाणी गळती व पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी सक्षम होते. मात्र, घटनेच्या वेळी कंत्राटदाराचा ऑपरेटर वेळेवर कृती करण्यात अपयशी ठरला. यामुळे पाणी स्थानकात पसरले. याची गंभीर दखल घेत सीजी/चीफ प्रोजेक्ट मॅनेजर - 1 राजेश कुमार मित्तल यांनी कंत्राटदार डोगस-सोमा जेव्हीला कारणे दाखवा नोटीस पाठवली व दोष निश्चित झाल्यानंतर दंड ठोठावला.