

मुंबई : कॅडबरी जंक्शन ते गायमुख मेट्रो 4 मार्गिकेवर आज घटस्थापनेच्या दिवशी पहिली चाचणी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सकाळी 10.30 वाजता ही चाचणी होणार आहे.
मेट्रो 4 मार्गिकेचा पहिला टप्पा आणि मेट्रो 4 अ मार्गिका डिसेंबरपर्यंत सुरू करण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्नशील आहे. त्यामुळे आज या मार्गिकेवर मेट्रोची पहिली चाचणी केली जात आहे. ऑगस्टमध्ये चाचणीसाठीचे मेट्रोचे डबे रुळांवर चढवण्यात आले. गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा मेट्रो 4 मार्गिकेचा काही भाग आणि मेट्रो 4 अ ही मार्गिका अशा दोन्ही मार्गिका मिळून 10 स्थानके आहेत. त्यापैकी गायमुख येथून चाचणीला सुरुवात होणार आहे.
या 10.5 किमी मार्गिकेवर कॅडबरी, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकूजिनीवाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनीवाडा आणि गायमुख या स्थानकांचा समावेश आहे. ही मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर पूर्व उपनगरातील मुंबईकरांनाही मेट्रोने प्रवास करता येणार आहे.
वडाळा ते कासारवडवली या मेट्रो 4 मार्गिकेवरील 6 स्थानकांच्या स्थापत्य कामांसाठी एमएमआरडीएने 161.88 कोटींची निविदा मागवली आहे.