

मुंबई : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या माँसाहेबमीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकून विटंबना केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. उपेंद्र गुणाजी पावसकर असे त्याचे नाव असून त्याने गुन्हा कबूल केल्याची माहिती सूत्रांनी ‘पुढारी न्यूज’ला दिली आहे.
बुधवारी सकाळी शिवाजी पार्क परिसरात नेहमीप्रमाणे नागरिक मॉर्निंग वॉक करीत असताना माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लालरंग फेकल्याची घटना समोर आली. हा ऑइल पेंट सदृश्य लाल रंग असल्याचे समजते. या घटनेमुळे दादरमध्ये तणाव निर्माण झाला होता. परंतु, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर ताबा मिळवला.
संध्याकाळी उशिरा पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले. उपेंद्र गुणाजी पावसकर असे या संशयिताचे नाव आहे. संशयित उपेंद्र पावसकर हा ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचेही समोर आले आहे. चौकशीत उपेंद्रने हे कृत्य का केले हे देखील समोर आले आहे. संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा उपेंद्रचा दावा आहे. उपेंद्र हा दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सातत्याने यायचा, असं देखील तपासात समोर आले आहे.
या घटनेनंतर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, महादेव देवळे, उपनेत्या विशाखा राऊत, विभागप्रमुख, शाखाप्रमुख तसेच कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसैनिकांनी पुतळ्याला गराडा घालून जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा निषेध केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसैनिकांनी त्वरीत पुतळ्याची साफसफाई केली.
2006 मध्येही मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडला होता. आताही पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्याने शिवसैनिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांकडून माँसाहेब अमर रहे...अशा घोषणा देण्यात आल्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मीनाताई पुतळ्याची विटंबना झाल्याचे समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर तसेच मोठ्या संख्येने मनसैनिकही जमा झाले होते. राज यांनी उपस्थित ठाकरेंच्या नेत्यांशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. तसेच पोलीसांशी संवाद साधत पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला ताबडतोब शोधून काढा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. आजचा निंदनीय प्रकार घडला असून ते करणाऱ्या दोनच वृत्ती असू शकतात. एक म्हणजे ज्यांना आपल्या आई-वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते अशा लावारिस, बेवारस माणसाचे हे कृत्य असेल. किंवा बिहारमध्ये मोदीजींच्या मातोश्रीचा अपमान झाला त्यामुळे बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न झाला, असाच कुणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा हा उद्योग असू शकतो, असा आरोप ठाकरेंनी केला. शिवसैनिकांच्या भावना तीव्र असून तूर्त आम्ही सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी पुतळ्याची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे व ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माँसाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची जाऊन पाहणी केली. दोन्ही ठाकरे बंधूंनी स्वतंत्रपणे पाहणी केली. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधुच्या पक्षाची युतीची चर्चा असून दोघांच्याही भेटीचा सिलसिला वाढला आहे. अलिकडेच उद्धव ठाकरे यांनी गणपती उत्सवात व त्यानंतर गेल्या आठवड्यात अचानकपणे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दिलेली भेट राजकिय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. आजच्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे माँसाहेबांच्या पुतळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा हाकेच्या अंतरावर असलेल्या राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतील किंवा राज ठाकरे पुतळ्याच्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, तसे न होता पुतळ्याच्या पाहणीनंतर दोन्ही बंधू परस्परपणे आपापल्या निवासस्थानी निघून गेले.