मुंबई : राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पहिल्याच यादीत प्रवेश मिळूनही न घेतल्याचे चित्र आहे. एमबीबीएस (वैद्यकीय)च्या तब्बल 1 हजार 257, तर बीडीएस(दंत)च्या 1 हजार 746 विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळूनही तो नाकारल्याचे दिसत आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमातील जवळपास सर्वच शासकीय आणि खासगी महाविद्यालयांतील जागांचे वाटप केले होते.
शुक्रवार सायंकाळपर्यंत महाविद्यालयांत प्रत्यक्ष हजर राहून 6 हजार 848 जणांनी एमबीबीएस अभ्यासक्रमांसाठी, तर 961 विद्यार्थ्यांनी बीडीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतले आहेत. एमबीबीएसला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद जास्त असला, तरी बीडीएस अभ्यासक्रमाला कमी प्रवेश घेतल्याने जागा रिक्त राहिल्या आहेत.
एमबीबीएसला राज्य कोट्यातील 8 हजार 138 जागांपैकी 8 हजार 106 जागांवर प्रवेशाची संधी या यादीत मिळाली होती. त्यापैकी 6 हजार 848 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यापैकी 1 हजार 257 विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळूनही नाकारला आहे. यामध्ये शासकीय महाविद्यालयांत 4 हजार 920 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी 4 हजार 887 जागा अलॉट झाल्या. 4 हजार 417 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर 469 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत.
खासगी महाविद्यालयांत 3 हजार 219 जागा अलॉट झाल्या होत्या. त्यापैकी 2 हजार 431 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला; परंतु 788 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. बीडीएस अभ्यासक्रमात 2 हजार 725 जागांपैकी 2 हजार 709 जागा अलॉट झाल्या होत्या. त्यापैकी 961 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. मात्र तब्बल 1 हजार 746 विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला. शासकीय महाविद्यालयांमध्ये 325 जागांपैकी 311 जागा अलॉट झाल्या, पण फक्त 171 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. खासगी दंत महाविद्यालयांत 2 हजार 398 जागा अलॉट झाल्या होत्या. त्यापैकी फक्त 790 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. तर 1 हजार 610 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी हजेरी लावली नसल्याचे दिसून आले आहे.
वैद्यकीय प्रवेशात मुंबईकर राज्यात चौथ्या क्रमांकावर
राज्यातील एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशाच्या पहिल्या फेरीत सीईटीने जाहीर केलेल्य यादीत तब्बल 8 हजार 138 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला यापैकी किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे हे शनिवारी समाजणार असले तरी पहिल्या यादीत स्थान मिळालेले विद्यार्थी 734 विद्यार्थी मुंबईतील आहेत. त्यापैकी तब्बल 429 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत जागा निश्चित झाल्याचे दिसून येत आहे.
या संधीत राज्यात लातूरमधील 1 हजार 203 विद्यार्थी आणि नांदेड मधील 936 विद्यार्थ्यांना स्थान मिळाल्याने मराठवाड्यातील जिल्ह्यांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. यानंतर पुणे 873 विद्यार्थ्यांना स्थान आहे. यानंतर मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. यावर तज्ञ सांगत आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमात लातूर पॅटर्न हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक ठरला असला, तरी मुंबईत अभ्यासासोबतच प्रयोगशाळा सुविधा, स्पर्धात्मक वातावरण आणि विविध कोचिंग पर्याय उपलब्ध असल्याने इथले यश निश्चितच महत्त्वाचे आहे.