

मुंबई : वैद्यकीय (एमबीबीएस) अभ्यासक्रमासाठी 8 हजार 106 विद्यार्थ्यांना तर दंत (बीडीएस) अभ्यासक्रमासाठी 2 हजार 709 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना 22 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची निवड यादी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) जाहीर करण्यात आली.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने केंद्रीय कोट्यातील प्रवेश प्रक्रियेची निवड यादी जाहीर केल्यानंतर आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राज्य कोट्यातील वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची पहिली निवड यादी जाहीर केली. या यादीमध्ये राज्य कोट्यातंर्गत असलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 8 हजार 138 जागांपैकी 8 हजार 106 जागांवर तसेच दंत अभ्यासक्रमाच्या राज्य कोट्यांतर्गत 2 हजार 718 जागांपैकी 2 हजार 709 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना 22 ऑगस्टपर्यंत सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे, या कालावधीत 15 ऑगस्ट रोजी असलेल्या स्वातंत्र्य दिन व 16 ऑगस्ट रोजी असलेल्या गोकुळाष्टमीच्या दिवशी प्रवेश बंद असणार असल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट केले आहे.
वैद्यकीय समुपदेशन समितीने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकामध्ये वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सत्र हे 1 सप्टेंबर 2025 पासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र या अभ्यासक्रमाची पहिल्या फेरीची प्रक्रियेला मुदतवाढ दिल्याने पहिली फेर्यातील प्रवेश हे 22 ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून महाविद्यालय सुरू होणार आहेत.
वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या पहिल्या यादीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी केंद्रीय कोट्यांतर्गत प्रवेशासाठी अर्ज केलेला असतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्या कोट्यातून चांगले महाविद्यालय उपलब्ध झाल्यास ते त्या कोट्यातून प्रवेश घेतात. तसेच पहिल्या निवड यादीतील अनेक विद्यार्थी ‘अधिक चांगले महाविद्यालय’ हा पर्याय निवडतात. त्यामुळे दरवर्षी पहिल्या यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी साधारणपणे 50 ते 60 टक्केच विद्यार्थी पहिल्या फेरीमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे या फेरीमध्ये शिल्लक राहिलेल्या जागा या दुसर्या फेरीसाठी उपलब्ध केल्या जातात.