

मुंबई : वसुबारस सणाने दीपोत्सवास प्रारंभ झाला अन् प्रकाशपर्वाच्या तेजासोबतच सेन्सेक्स आणि सोन्याच्या तेजीने दिवाळी तेजोमय झाली. दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 484 अंकांनी वाढून चार महिन्यांचा उच्चांक गाठला. निफ्टीने 124 अंकासह गत वर्षभरातील उच्चांकी आकड्यावर झेप घेतली; तर दुसरीकडे सोने दरातही दिवसात विक्रमी 3600 रुपयांची वाढ झाली. पण त्याचबरोबर दरवाढीचे रोज नवनवे विक्रम रचणारी चांदी मात्र घसरली. दोन दिवसांत पाच हजार रुपयांची घसरण झाली.
जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता असतानाही कंपन्यांचे तिमाही निकाल समाधानकारक आल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पसरला आहे. त्यातच विदेशी संस्थांनी गुंतवणूक वाढविल्याने सलग तिसर्या सत्रात शेअर निर्देशांकाने उसळी घेतली. त्यामुळे सेन्सेक्सने चार महिन्यांचा उच्चांकी आकडा गाठला असून निफ्टीने गत वर्षभरातील उच्चांकी आकड्यावर झेप घेतली आहे.
मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सेन्सेक्स 484 अंकांनी (0.58 टक्के) वाढून 83,952 अंकांवर गेला. सेन्सेक्सची 26 जून 2025 नंतरची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांक 124 अंकांनी (0.49 टक्के) वधारून 25,709 अंकांवर झेपावला. निफ्टीची ही गत वर्षभरातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्स 1,921 अंकांनी आणि निफ्टी निर्देशांक 563 अंकांनी वधारला आहे.
सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक आत्तापर्यंतच्या उच्चांकी आकड्यापासून अवघे दोन टक्के दूर आहे. गतवर्षी 27 सप्टेंबर रोजी सेन्सेक्सने उच्चांकी 85,978 आणि निफ्टी निर्देशांक 26,277 अंकांवर गेला होता.
जळगाव येथील सराफ बाजारामध्ये दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या विक्रमी वाढ झाली; तर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3 हजार 600 रुपयांनी वाढ झाली असून चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील शुल्क आणि कर वेगवेगळे असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी या दोन्ही धातूंच्या दरांमध्ये तफावत दिसून येते. सोन्याच्या दहा ग्रॅमसाठी दर जीएसटीसह 1 लाख 35 हजार 239 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा प्रतिकिलो दर जीएसटीसह 1 लाख 80 हजार रुपये झाला आहे. जळगावात सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे दराने विनाजीएसटी 1 लाख 31 हजार 300 रुपयांचा टप्पा गाठला आहे.
सोने-चांदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढत असल्याने चांदीबरोबर जळगावच्या सराफ बाजारांमध्ये सोन्याचाही काही प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याचे सराफ व्यावसायिक यांनी सांगितले. अशाच पद्धतीने दर वाढत राहिल्यास दिवाळीत ऐन मुहूर्तावर सोन्याचा मोठा तुटवडा जाणवेल, अशी शक्यतादेखील सराफ व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे.
चांदीने यावर्षी इतिहास रचला. एक किलो चांदीचा भाव 1 लाख 85 हजार झाला होता. गेल्या दोन दिवसांत चांदीत पाच हजारांची घसरण झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.