

प्रकाश साबळे
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी प्रथम मराठवाड्यात रणशिंण फुंकणारे मराठवाड्यातील सुपुत्र तथा मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरु केलेल्या आंदोलकांना दोन वेळचे जेवण आणि नाश्त्यासाठी मैदानाबाहेरील मराठवाड्यातील अन्नछत्रामध्ये हजारो आंदोलकांच्या जेवनाच्या पंक्त्या उठत होत्या. या अन्नछत्रामुळे गेली पाच दिवस आंदोलकांची नाश्तासह दोन वेळच्या जेवणाची चांगली सोय झाली होती. आंदोलन संपल्यानंतरसुध्दा रात्रीचे जेवण आंदोलकांना मिळाले.
मनोज जरांगे-पाटील यांचे आझाद मैदानात शुक्रवारपासून आंदोलन सुरू होते. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आंदोलकांचे पाणी, जेवणाअभावी प्रचंड हाल झाले होते. यामुळे संतप्त झालेल्या मराठवाड्यातील मराठा आंदोलकांनी रविवारी आझाद मैदानाच्या मागील बाजूला थेट अन्नछत्र उभारले होते. यात सकाळी नाश्ता तर दुपारी आणि रात्री पोटभर जेवणाची व्यवस्था केली होती. सोमवारी तर सुमारे दीड लाख आंदोलक जेवल्याचा दावा अन्नछत्राच्या स्वयंसेवकांनी केला.
सकाळी नाश्त्यामध्ये पोहे तर दुपारी आणि रात्रीच्या जेवणात भाजी, भाकरी, दाळ खिचडी, पुलावसह विविध प्रकारची चटणी, आचार, सलाट आदीं
या अन्नछत्रामध्ये ३२ आचाऱ्यांसह ४० कामगार कार्यरत आहेत. यासाठी ९ गॅस सिलेंडरच्या भट्टया, २५ मोठे टोप, फॉर्च्यून कंपनीचे तेल, बासमती तांदूळ तसेच दररोज एक लाख पिण्याच्या बॉटल वितरित केल्या जात होत्या, असा दावा अन्नछत्रातील स्वयंसेवकांनी केला.
आंदोलकांची खाण्या-पिण्याअभावी कुठलीही गैरसोय होवू नये, म्हणून मराठवाड्यातील अनेक खेड्या-पाड्यांतून भाकरी, चटणी, भेल पार्सल येत होत्या, तेही आंदोलकांना वाटप केले जात होते. यामुळे या अन्नछत्राजवळ दिवसभरांत कधीही आंदोलक गेल्यास त्यांना पोटभर जेवण मिळत असत.
अन्नछत्रात आंदोलकांकडून सोमवारी सुमारे १ लाख १२ हजार प्लेट संपविल्या. तर रविवारी ९२ हजार आंदोलकांनी आणि मंगळवारी एक लाख आंदोलनकर्ते जेवल्याची अन्नछत्राचे स्वयंसेवक विनोद काकडे यांनी दिली.
मराठा आरक्षणासाठी शुक्रवारी आझाद मैदानावर आलेल्या आंदोलकांची जेवण,पाण्याअभावी झालेली हेळसांड पाहून मन दुखाविले, आणि रविवारी याच मैदानाबाहेर अन्नछत्र सुरु केले. तीन दिवसांत लाखो आंदोलनकर्ते जेवण करून गेले. याचे आम्हाला पुर्णपणे समाधान आहे. आंदोलन संपेपर्यंत आम्ही जेवण देण्याची व्यवस्था करून ठेवली होती. विनोद काकडे, अन्नछत्राचे स्वयंसेवक