

मुंबई : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येणार, या केवळ शक्यतेनेच महायुती सरकारला मोठा धक्का दिला आहे. राज्यात हिंदी सक्तीच्या विरोधात पेटलेले रान आणि त्याला उत्तर म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुकारलेला 5 जुलैचा मोर्चा, ज्याला शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता, त्या संभाव्य एकजुटीच्या धसक्याने अखेर सरकार एक पाऊल मागे आले आहे. त्यामुळे ५ जुलै रोजी होणार मोर्चा रद्द झाल्याची माहिती संजय राऊत यांनी एक्स पोस्टवरुन दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन्ही वादग्रस्त शासन निर्णय (जीआर) रद्द करत असल्याची घोषणा केली. या निर्णयाचे स्वागत होत असले तरी, हा मराठी एकजुटीचा आणि ‘ठाकरे’ ब्रँडच्या दबावाचा विजय असल्याचे ट्विट शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी केले.
त्रिभाषा धोरणाच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जुलै २०२५ रोजी मुंबईत गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती, तर शिवसेना (उबाठा) गटाने या मोर्चाला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. मराठी एकजुटीसाठी दोन्ही गटांनी एकत्र येऊन ५ जुलै २०२५ रोजी एकच मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आता शासनाने त्रिभाषा धोरण रद्दचा निर्णय घेण्यात आल्याने संजय राऊत यांनी याबाबत ट्विटद्वारे मोर्चा रद्द करण्यात येणार असल्याची माहीती दिली.
५ जुलै रोजी होणाऱ्या हिंदी सक्ती विरोधातील मोर्चामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन बंधू एकत्र येणार होते. या दोघांच्या एकत्र येण्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाची वाटचाल वेगळ्या दिशेने गेले असते. या निर्णयाला दोन्ही पक्षांनी कडाडून विरोध दर्शवला होता. या आंदोलनाचा मुख्य उद्देश मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचे रक्षण करणे असा होता. पण आता हा मोर्चा रद्द झाल्यामुळे हे दोन्ही पक्ष ५ तारखेला काय करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.