

मुंबई : रिक्षा परवाना घेतल्यानंतर गेली अनेक वर्षे मुंबई व परिसरात वास्तव्य करणाऱ्यांना मराठी बोलता येत नाही, अशा रिक्षा चालकांची परिवहन विभाग चाचणी घेणार आहे. या परीक्षेत चालकांकडून मराठीत परिच्छेद लिहून घेण्याबरोबरच त्यांना मराठीत वाचता-बोलता येते का, याची खातरजमा केली जाईल. परीक्षेत नापास होणाऱ्या चालकांचा परवाना रद्द केला जाणार आहे. मीरा-भाईंदर येथून सुरू होणारी मोहीम संपूर्ण राज्यात राबवली जाणार आहे.
मुंबई व राज्यात प्ररप्रांतीय रिक्षा चालकांची संख्या मोठी आहे. मुंबई व उपनगरात परप्रांतीय रिक्षा चालकांचे प्रमाण अधिक आहे. प्रवासात प्रवाशांशी मराठीतून न बोलणे, उर्मट बोलणे, मराठीत बोलण्यास नकार देणाऱ्या परप्रांतीय रिक्षाचालकांमुळे वादाचे प्रकार वाढत असून ते मारहाणीपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे राज्यात मराठी भाषेच्या वापरावरून आणि परप्रांतीय रिक्षाचालकांच्या वर्तणुकीवरून राजकीय व सामाजिक वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे परवाने रद्द करण्याची मागणी होत आहे.
मीरा-भाईंदरमध्ये सुमारे 12 हजार परवानाधारक रिक्षाचालक आहेत. त्यांच्या वर्तणुकीबद्दल अनेक तक्रारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे आल्या आहेत. एकाच घरच्या पत्त्यावर 22 ते 30 जणांना परवाना दिला असून बोगस कागदपत्रे देऊन रिक्षाचालकांनी परवाने मिळविल्याच्या तक्रारी आहेत.
महाराष्ट्र मोटार वाहन नियमाचा आधार घेत रिक्षा चालकांना मराठी भाषेचे ज्ञान आहे किंवा नाही याची 1 मे पर्यंत तपासणी होणार आहे, अशी माहिती परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.