Marathi Rajbhasha Gaurav Din | मुंबईतून मराठी माणसाची हकालपट्टी !

उपकरप्राप्त इमारतींमधून संक्रमण शिबिरांत अन् तिथून थेट मुंबईबाहेर
Marathi Rajbhasha Gaurav Din
Marathi Rajbhasha Gaurav Din | मुंबईतून मराठी माणसाची हकालपट्टी ! file photo
Published on
Updated on

मुंबई : नमिता धुरी

मराठी भाषेला मिळालेला 'अभिजात' दर्जा, नवी दिल्ली येथे पार पडलेले ९८वे 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन', असा मराठीचा डंका सर्वदूर वाजत असतानाच मराठी भाषा टिकवणारा मराठी माणूसच मुंबईतून परांगदा होत आहे. मराठी भाषेचे जतन, संवर्धन करण्याची जबाबदारी ज्याच्यावर तोच मराठी माणूस हजारोंच्या संख्येने मुख्य मुंबई शहरातून बाहेर फेकला जात आहे. तो तसा बाहेरच फेकला जावा यासाठी शासकीय स्तरावर जाणीवपूर्वक धोरणे आखली गेली, हे त्याचे दुर्दैव.

म्हाडाच्या १९ हजार जुन्या उपकरप्राप्त इमारती दक्षिण मुंबईत होत्या. त्यापैकी आता १३ हजार शिल्लक आहेत. उपकरप्राप्त इमारतींमध्ये पिढ्यान्पिढ्या राहणारी बहुतांश कुटुंबे मराठी होती व आहेत. ज्या इमारती धोकादायक झाल्याने तोडल्या जातात तेथील रहिवाशांना संक्रमण शिबिरांमध्ये पाठवले जाते. त्यानंतर वर्षानुवर्षे हे रहिवासी संक्रमण शिबिरातच अडकून पडतात. सध्या म्हाडाकडे संक्रमण शिबिरांच्या १०० हन अधिक इमारती आहेत. त्यात २० हजार कुटुंबे वास्तव्यास आहेत. संक्रमण इमारतींपैकी केवळ ४९ मुंबई शहरात आहेत तर ८७ मुंबई उपनगरात आहेत. संक्रमण शिबिरात राहणार्यांसाठी म्हाडाने बृहतसूचीतून घरे देण्याची योजना आखली; मात्र यातून दक्षिण मुंबईत घर मिळण्याची खात्री सर्वांनाच नसते. काही तोडलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचे नियोजन म्हाडाने केले आहे. अशा इमारतींचे रहिवासी बृहतसूचीसाठी अपात्र ठरवले जातात. वर्षानुवर्षे पुनर्विकास रखडल्याने त्यांना मूळ जागी घरे मिळत नाहीत आणि संक्रमण शिबिरातील राहत्या घराचा मालकी हक्क त्यांच्याकडे नसतो. माझगाव म्हातारपाखाडी येथील म्हाडाची उपकरप्राप्त इमारत तुकाराम नाडकर यांनी १९८५ साली सोडली. त्यांना चेंबूरच्या सुभाषनगर संक्रमण शिबिरात पाठवण्यात आले. २०१४ साली ते बृहतसूचीसाठी पात्र ठरले होते. म्हातारपाखाडी येथील इमारतीचा पुनर्विकास होणार असल्याचे सांगून २०१६ साली नाडकर यांना बृहतसूचीसाठी अपात्र ठरवण्यात आले. पुनर्विकास करण्यासाठी काही वर्षांपूर्वी विकासकाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले; मात्र त्याने तेथे काम सुरू केलेले नाही. पुनर्विकासाच्या नियमानुसार द्यावे लागणारे आगाऊ भाडेही विकासकाने दिलेले नाही.

नाडकर कुटुंबियांसह ७ कुटुंबांना साकीनाका संक्रमण शिबिरात स्थलांतरित होण्यास म्हाडाने सांगितले होते; मात्र तेथील उद्वाहन बंद आहे. म्हाडाने दिलेले घर पाचव्या मजल्यावर आहे. कोणीही राहात नसल्याने इमारत ओसाड आहे', तुकाराम नाडकर यांचा मुलगा प्रवीण नाडकर सांगत होता. आता नाडकर कुटुंबीय दरमहा १० हजार भाडे भरून नवी मुंबईत भाड्याने राहात आहेत. १९८५ ते २०१७ या काळात सचिन घाणेकर यांच्या वडिलांचे म्हातारपाखाडीतील घर सुटले व ते सुभाषनगर संक्रमण शिबिरात राहू लागले. या इमारतीचाही पुनर्विकास करण्यात येणार असल्याचे सांगून त्यांना २०१८ साली मुलुंडच्या गवाणपाडा संक्रमण शिबिरात पाठवण्यात आले. त्यांना आजही म्हातारपाखाडीतील घराची प्रतीक्षा आहे. १९८२ साली नरेंद्र पंडित यांना कुंभारवाडा येथील घर म्हाडाच्या नोटिशीमुळे सोडावे लागले. त्यांना घाटकोपरच्या संक्रमण शिबिरात पाठवले जाणार होते; मात्र तेथील इमारतीची अवस्था चांगली नसल्याने त्यांनी गोरेगावला घर देण्याची विनंती केली. बराच पाठपुरावा केल्यानंतर त्यांना ओशिवरा संक्रमण शिबिरात पाठवण्यात आले. अपुरा पाणी पुरवठा, चोरीमारी असा सगळा मनःस्ताप भोगत काही वर्षे घालवली खरी पण १९९२ सालच्या दंगलीनंतर तिथे थांबणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी गोरेगावच्या सिद्धार्थनगर संक्रमण शिबिरात बदली करून घेतली. २०१३ साली म्हाडाने त्यांची रवानगी बोरिवलीला गोराई रोड येथील संक्रमण शिबिरात केली. पंडित यांनी बृहतसूचीसाठी अर्ज केला होता. सर्व कागदपत्रे म्हाडामध्ये जमा केली होती; मात्र म्हाडाच्या अंतर्गत भोंगळ कारभारामुळे ती कागदपत्रे संबंधित विभागाकडे जमाच झाली नाहीत व त्यांची बृहतसूचीवरील घराची संधी हुकली. अशाप्रकारे मराठी कुटुंबांचे भविष्य अधांतरी असताना म्हाडाच्या सोडतींतील घरांच्या किंमतीही कोट्यवधींमध्ये आहेत. परिणामी, मराठी कुटुंबांना विरार, पनवेल या ठिकाणी घरे घेऊन तेथून कामानिमित्त मुंबईपर्यंतचा प्रवास रोज करावा लागत आहे.

एकेकाळी मुंबईचा रहिवाशी असलेला मराठी माणूस आज मुंबईत रोज पाहुणा म्हणून येत आहे. उपकरप्राप्त इमारतींचा लवकरात लवकर पुनर्विकास करून मूळ रहिवाशांना तेथे घरे द्यावीत, जेणेकरून लोक मुंबईतच स्थायिक होतील. पुनर्विकास न करून आणि रहिवाशांना संक्रमण शिबिरात राहायला भाग पाडून त्यांचा हक्का मारला जात आहे.

- अभिजीत पेठे, अध्यक्ष, ट्रान्झिट कॅम्प असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news