मुंबईतून मराठी भाषा हरवतेय!

Marathi language Day : माय मराठी मुंबईमध्ये अमराठी भाषेलाच महत्त्व
Marathi language Day
मराठी राजभाषा गौरव दिन विशेष
Published on
Updated on

मुंबई : सर्वाधिक मराठी भाषिक असलेल्या मुंबईतून मराठी भाषा हरवत चालली आहे. माय मराठी मुंबईत अमराठी भाषेलाच विशेष महत्त्व दिले जात आहे. अगदी मराठी माणूसही हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये संभाषण करताना दिसतो. रिक्षा, टॅक्सी प्रवासादरम्यान सर्रासपणे हिंदी भाषेतच संवाद साधला जातो. एवढेच काय तर बँका, केंद्र सरकारी कार्यालय, मार्केट, मॉल, रेल्वे तिकीट विंडो येथेही हिंदी भाषेतच संभाषण ऐकायला मिळते. मग दोन मराठी माणसे असली तरी ते सवयीप्रमाणे एकमेकांशी हिंदी भाषेतच बोलतात.

राज्यात दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला आहे. पण, राज्याची राजधानी मुंबईमध्ये मराठी भाषेला तितकेसे महत्त्व मिळालेले नाही. अगदी मराठी माणूसही हिंदी भाषेत गुरफटला गेला आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये 100 टक्के मराठी भाषेत कामकाज चालावे, असे लिखित असले तरी पालिकेत एक-दोन वर्षांसाठी येणारे सनदी अधिकारी मग ते मराठी असले तरी इंग्रजी भाषेला महत्त्व देताना दिसतात. मुंबईतील काही बँका वगळल्या तर अन्य बँकांमध्ये सर्रासपणे ग्राहक व कर्मचार्‍यांचा संवाद हा हिंदी व इंग्रजी भाषेतच होतो. टॅक्सी-रिक्षाने आपण जात असलो तरी भैया चर्चगेट चलोगे क्या.. असा चक्क हिंदी भाषेत संवाद साधतो.

मुंबईतील मार्केटमध्ये खरेदीला जाणार्‍या मराठी महिला भगिनीही हिंदीतूनच संवाद साधतात. मराठी माध्यमाच्या शाळा वगळता, अन्य शाळांमध्ये पालक व शिक्षकांमध्ये मराठी भाषेत कधीच संवाद होत नाही. रेल्वेच्या तिकीट विंडोवर गेल्यानंतरही आपण एक दादर तिकीट दिजीये.. असेच म्हणतो. रेल्वे प्रवासातही हिंदी भाषेतून संवाद साधणारे अनेक जण भेटतील. एखाद्या मॉलमध्ये किंवा मल्टिप्लेक्स चित्रपटगृहामध्ये तिकीट काढण्यासाठी गेल्यानंतर हिंदीतून प्रश्न विचारला जातो. आपणही हिंदीतूनच त्याला उत्तर देतो. मुंबईतील बहुतांश न्यायालयातही मराठी भाषेचा वापर होत नाही.

मराठी माणसाने मराठीतच बोलावे

मुंबईत मराठी भाषेचे महत्त्व टिकवण्यासाठी किमान प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेतच संवाद साधायला हवा. विशेषत: टॅक्सी रिक्षाने प्रवास करताना मराठी भाषेचा वापर व्हायलाच हवा. समोरच्याला मराठी समजत नसले तरी आपण मराठी भाषेतच बोललो तर त्यााला ते शिकावे लागणारच. त्यामुळे किमान मराठी माणसाने तरी मराठी भाषेत बोलण्यास हरकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news