

मुंबई : नमिता धुरी
जिल्हा परिषदेची शाळा मोफत शिक्षण देते; पण आठवीपर्यंतच. इथे ना संगणक कक्ष, ना विज्ञान प्रयोगशाळा. पुढील शिक्षणासाठी कित्येक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. अशी अवस्था गेली कित्येक वर्षे मराठा आंदोलकांच्या गावांमध्ये आहे. जिथे दहावी-बारावी शिकायची सोय नाही, तिथे उच्च शिक्षणासाठी आरक्षण मिळाल्यास त्याचा लाभ घेणार कोण, असा प्रश्न उभा राहतो.
'कमी गुण मिळवणाऱ्यांना प्रवेश मिळतो आणि आम्हाला जास्त गुण असूनही केवळ पैशांअभावी प्रवेश मिळत नाही', ही सल गेल्या काही पिढ्यांपासून मराठा समाजाच्या मनात आहे. त्यातूनच उभे राहिलेले 'एक मराठा, लाख मराठा' हे आंदोलन गेल्या आठवड्याअखेरीस मुंबईत धडकले. आंदोलनानंतर आरक्षण मिळाले तरी ते उच्च शिक्षणात लागू होईल; पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेले प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी पुरेशा सुविधाच या आंदोलकांच्या गावांमध्ये नाहीत.
मात्र अकरावीसाठी १२ किमीचा प्रवास करावा लागतो. बीडच्या लिंबरोई गावात पाचवीपर्यंत २००हून अधिक विद्यार्थ्यांसाठी ५ शिक्षक आहेत. सहावी ते दहावीसाठी खासगी शाळा आणि पुढे ४० किमीवरच्या महाविद्यालयाचा आधार घ्यावा लागतो.
पांडुरंग चव्हाण या मराठा आंदोलकाचे चव्हाणवाडी गाव तुळजापूरमध्ये आहे. येथे आठवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. नववी-दहावीचे शिक्षण १० किमीवर असलेल्या नांदुरी, काठगावमध्ये होते. यात निम्म्या मुलींचे शिक्षण सुटते. कारण माध्यमिक शाळेत जायला पुरेशा एसटी नाहीत. अकरावी-बारावीसाठी ५० किमीवर सोलापूर, तुळजापूर गाठावे लागते. तेथे वसतिगृहाचा वार्षिक खर्च ४० हजार रुपये येतो. गावातील केवळ ३० टक्के मुली दहावीपर्यंत शिकल्या आहेत. ८५ ते ९० टक्के मिळवूनही विद्यार्थ्यांना पुणे, लातूर येथील महाविद्यालयात जावे लागते.
जालन्याच्या विजय पाटील यांच्या आरडा तोलाजी गावात आठवीपर्यंत शाळा आहे. नववी ते बारावीपर्यंत ९ किमीवर आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी ३० किमीवर जावे लागते. दहावीला ६५ टक्के गुण असूनही आयटीआयमध्ये इलेक्ट्रीकलला प्रवेश मिळाला नाही, याउलट ४० टक्के गुण असणाऱ्याला प्रवेश मिळाला, असे पाटील सांगतात. फलटणच्या निंबळक गावात सातवीपर्यंत २५० विद्यार्थी, ७ शिक्षक आहेत. स्वयंसेवी संस्थेची दहावीपर्यंत शाळा आहे.
संगमनेर तालुक्यातील उंब्री गावचे माजी सरपंच किरण भुसाळ यांच्या भावाचा एमबीबीएस प्रवेश केवळ दोन गुणांनी हुकला. खासगी महाविद्यालयाचे शुल्क परवडणार नाही म्हणून एक वर्ष वाया घालवून पुढील वर्षी प्रवेश घ्यावा लागला. अकरावी-बारावीसाठी मुलांना २० किमीवर असलेल्या संगमनेर, लोणी येथे जावे लागते. ५ किमीवर अश्वीमध्ये बीए, बीकॉम, बीएस्सी होते. गावातल्या शाळेत पहिली ते चौथीला १०० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक आहेत. स्थानिक आमदाराने पाचवी ते दहावीपर्यंत शाळा सुरू केली आहे.
हिंगोलीच्या पुयीनी गावात आठवीपर्यंत २००पेक्षा जास्त विद्यार्थी शिकतात. दहा वर्षांपूर्वी तेथे एक संगणक आला. त्याला आजतागायत शिक्षक मिळालेला नाही. १६ किमी प्रवास केल्यावर संगणक शिक्षण आणि नववी ते बीए, एमएपर्यंत शिक्षण होते. बीडच्या सखाराम वायबळ यांच्या गुंदावाडी गावात पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. येथे ३५ विद्यार्थी, १ मुख्याध्यापक आणि १ शिक्षक आहे. गावापासून दोन किमीवर वडगाव येथे सहावी ते दहावी शाळा आहे. तेथे पंचक्रोशीतील ५०० विद्यार्थी शिकतात. शिक्षक केवळ १२ आहेत. शाळेत संगणक शिक्षण होत नाही. त्यासाठी १९ किमीवरच्या खासगी संगणक शिकवणीला जावे लागते. त्यासाठी गावातील मुले वडगावला पायी जातात, तेथून पुढे एसटीने प्रवास करतात. तीन महिन्यांच्या एमएससीआयटीसाठी ६ हजार रुपये मोजावे लागतात. ८ किमीवर पिंपळनेरला अकरावी-बारावीचे वर्ग आहेत. त्याचे वार्षिक शुल्क ८ हजार रुपये इतके आहे.