

मुंबई : आंदोलनाच्या तिसर्या दिवशी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) बाहेरील व मुंबई पालिकेसमोर मराठा आंदोलकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे या मार्गावरील दुतर्फा वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. एकप्रकारे रेल्वे स्थानक, आझाद मैदान परिसराला मराठ्यांनी वेढा घातल्याचे चित्र आहे. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली आहे तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महापालिका प्रशासनाने पाण्याचे टँकर व शौचालये उपलब्ध केल्याने मराठा आंदोलकांची गैरसोय झाली नाही. सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, उद्योजक यांनी आंदोलकांच्या जेवणाची सोय चांगल्या प्रकारे केली आहे. मात्र मराठा आंदोलकांनी अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणात केली असल्याचे दिसून येत आहे. कल्याण येथील उद्योजक प्रताप ढोबळे यांनी मराठा आंदोलकांना सीएसएमटी रेल्वेस्थानक व महापालिकेसमोरील रस्त्यावर जेवण वाटप केले.मी एक मराठा म्हणून मी हा पुढाकार घेतला आहे. जोपर्यंत आंदोलन सुरू असेल तोपर्यंत मराठा बांधवांच्या जेवणाची व्यवस्था करणार असल्याचे प्रताप ढोबळे यांनी सांगितले.
कांदिवली (पश्चिम) येथील चारकोप सह्याद्रीनगरमधील संदीप शिंदे, नितीन जगताप, भुषण निंबाळकर, किरण निकम, शेखर चव्हाण, संजय भोसले, शेखर चव्हाण, तुषार कदम, भरत पडवळ यांच्यासह 100 ते 125 मराठा कार्यकर्ते यांनी, 5 हजार समोसे, 5 हजार बिस्कीट पुडे व 5 हजार पाण्याच्या बाटल्या यांचे वाटप केले. याचबरोबर कर्हाड (जि.सातारा), बीड जिल्ह्यातील डोंगर किन्ही (ता. पाटोदा), नाशिक जिल्ह्यातील शिवबापूर प्रतिष्ठान, पुणे जिल्ह्यातील कारला व ग्रामीण परिसर आणि मराठा क्रांती मोर्चा बारामती आदीकडून जेवण देण्यात येत होते.