

Manoj Jarange Patil Protest Rally Latest News
मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो समाजबांधवांचा महामोर्चा अंतरवली सराटीतून बुधवारी (दि.२७) सकाळी दहा वाजता मुंबईकडे रवाना झाले असतानाच दुसरीकडे आझाद मैदानातील आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे. फक्त एका दिवसासाठी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही परवानगी देण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐन गणेशोत्सवात जरांगे यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टात दोन याचिका दाखल झाल्या आहेत. यातील पहिली याचिका एमी फाऊंडेशनचे अनिलकुमार मिश्रा तर दुसरी याचिका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली होती. या दोन्ही याचिकांच्या माध्यमातून जरांगेंच्या आझाद मैदानावरील उपोषणाला विरोध करण्यात आला होता. मंगळवारी हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणासाठी परवानगी नाकारत नवी मुंबई किंवा खारघर येथे उपोषणासाठी पर्याय दिला होता.
या पार्श्वभूमीवर बुधवारी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली. ध्वनिक्षेपक आणि इतर आवश्यक परवानग्या घ्याव्या लागणार असून गणेश विसर्जनाशिवाय रहदारीला अडथळा ठरणार नाही याची खबरदारी जरांगेंना घ्यावी लागणार आहे.
आंदोलनाला परवानगी मिळाल्याच्या वृत्तावर जरांगेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुंबईत आंदोलनाला परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद. मात्र एक दिवसाची परवानगी दिली असेल तर मग आमच्या मागण्याची अंमलबजावणी करावी लागेल. निर्णय काय झाला ते वाचून शिवनेरीवर पुढील निर्णय घेणार, अशी त्यांनी दिली.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांच्या मुख्य अटी
आंदोलनाला एका वेळी फक्त एकाच दिवसाची परवानगी असेल. शनिवार, रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी परवानगी मिळणार नाही.
ठराविक वाहनांनाच परवानगी असेल. वाहनांची पार्किंग व्यवस्था पोलीसांच्या सल्ल्याने करावी लागेल. आंदोलकांची वाहने ईस्टर्न फ्रीवेवरून वाडीबंदरपर्यंत येतील. त्यानंतर मुख्य नेत्यासोबत फक्त 5 गाड्यांना आझाद मैदानात प्रवेश मिळेल. बाकीच्या गाड्या पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी पार्क कराव्या लागतील.
आंदोलनात जास्तीत जास्त पाच हजार लोकच सहभागी होऊ शकतात. आझाद मैदानासाठी सात हजार चौ. मीटर जागा राखीव असून ती इतक्या लोकांनाच सामावून घेऊ शकते. त्याच दिवशी इतर आंदोलकांनाही परवानगी दिली असल्याने त्यांचा हक्क अबाधित राहील.
आंदोलनाच्या वेळी मोर्चा काढता येणार नाही.
परवानगीशिवाय माईक, स्पीकर किंवा गोंगाट करणारी साधने वापरता येणार नाहीत.
आंदोलनाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच मर्यादित आहे. त्यानंतर मैदानात थांबता येणार नाही.
आंदोलनाच्या जागेत स्वयंपाक करणे, कचरा टाकणे पूर्णपणे बंदी आहे.
आंदोलनाच्या काळात गणेशोत्सव सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास किंवा धार्मिक भावना दुखावणारे वर्तन करता येणार नाही.
आंदोलनात लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि वृद्धांना सहभागी करू नये.
गणेशोत्सवाच्या दरम्यान हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईतील रहदारीस कोणताही आंदोलनाच्या काळात गणेशोत्सव सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात यावी असं पोलिसांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या महामोर्चाचा मार्ग कोणता?
27 ऑगस्ट रोजी सकाळी ताफा निघाला असून पैठण, घोटण, तळणी, शेवगाव, पांढरीपूल, कल्याण फाटामार्गे नारायणगाव व जुन्नर येथे मुक्काम करणार आहे.
28 ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडाचे दर्शन घेऊन ताफा राजगुरूनगर, खेडमार्गे चाकणच्या दिशेने पुढे जाईल. चाकणहून महामोर्चा तळेगाव, लोणावळा, पनवेल व वाशीमार्गे मुंबई गाठणार असून, सायंकाळी आझाद मैदानावर पोहोचणार आहे.
मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला कधी बसणार आहेत?
29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू होणार आहे. मात्र मंगळवारी दुपारी न्यायालयाने आझाद मैदानावर उपोषणासाठी परवानगी नाकारत नवी मुंबई किंवा खारघर येथे उपोषणासाठी पर्याय दिला आहे.