

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू असतानाच एक धक्कादायक घटना घडली. मैदानातील एका झाडावर एका वयोवृद्ध व्यक्तीने गळफास घेऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच हा प्रकार आंदोलकांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी प्रसंगावधान दाखवत गळफास घेणा-या व्यक्तीला खाली उतरवले आणि त्याचा जीव वाचवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनामुळे आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमले होते. याच गर्दीत अचानक एका वयोवृद्ध व्यक्तीने बाजूच्या झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार काही आंदोलकांच्या लक्षात येताच एकच गोंधळ उडाला.
आंदोलकांनी कोणताही वेळ न घालवता तात्काळ झाडावर चढून त्या व्यक्तीला खाली उतरवले. आंदोलकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. या घटनेमुळे आंदोलनाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.