

मुंबई : विधीमंडळाच्या कामकाजादरम्यान ऑनलाईन पत्ते खेळल्याचे प्रकरण कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना चांगलेच भोवलेआहे. या प्रकरणावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती, मात्र सरकारने त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत कोकाटे यांचा खातेबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच कृषी खात्याचा पदभार दत्तात्रय भरणे यांच्याकडे दिला जाण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा खात्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे. कोकाटे यांचा राजीनामा घेतलेला नसला तरी, विधीमंडळात पत्ते खेळल्याच्या प्रकारामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
या खातेबदलामुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कोकाटे यांच्या जागी कोणाला कृषी खाते दिले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कोकाटे यांच्या खातेबदलाचा निर्णय हा केवळ शिस्तभंगाच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.