

मुंबई : वादग्रस्त वक्तव्ये आणि पावसाळी अधिवेशनात सभागृह सुरू असताना रमी खेळल्याच्या प्रकरणावरून अडचणीत आलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आता माफी मागायला तयार झाले आहेत. पण तुम्हाला किती वेळा संधी द्यायची, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांना फटकारल्याचे समजते.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यांमुळे केवळ सरकारच नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसपक्षसुद्धा अडचणीत आला आहे. त्यामुळे मागील आठवडाभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची भूमिका आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोंडाळ मंत्र्यांना इशारा दिल्यामुळे मंगळवारी कोकाटे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन आपण यापुढे चूक करणार नाही, अशी भावना व्यक्त केली.
मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांना सुनावले की, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आणि वागताना भान ठेवायला हवे. अनेकवेळा माफ केले आहे. आता माफ करू शकत नाही. यापुढे तरी नीट वागा, नाही तर अडचणीत याल अशा शब्दांत अजित पवार यांनी मंत्री कोकाटे यांना फटकारले.
आम्ही तुम्हाला खूप सांभाळले आहे. पण आता हा विषय पुढे गेला आहे. सतत चुका होत असल्यामुळे आता माफी नाही. आता राजीनामा नको म्हणून तुम्ही आला आहात. पण तुमच्या राजीनाम्यासाठी दबाव येत असल्याचे अजित पवार यांनी सुनावले. त्यावर यापुढे बोलताना आणि वागताना काळजी घेईन, असे कृषिमंत्री कोकाटे म्हणाल्याचे समजते.