

पाचगणी : मुंबईतील एका बड्या व्यावसायिकाला आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून आलेल्या धमकीच्या प्रकरणाचा छडा लावताना, पाचगणीजवळील गोडवली गावातून ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेशी संशयित संबंध असलेल्या एकाला मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर पथकाने (सीआययू) गुरुवारी नाट्यमयरीत्या ताब्यात घेतले. मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन (वय ३९, मूळ रा. जम्मू-काश्मीर, सध्या रा. गोडवली, ता. महाबळेश्वर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तो येथील एका बंगल्यात केअर टेकर म्हणून राहात होता.
मुंबईतील वांद्रे (पूर्व) परिसरातील एका अनधिकृत मशिदीच्या पाडकामाबाबत प्रशासनाला पाठिंबा दिल्याचा राग मनात धरून, प्रसिद्ध व्यावसायिक इम्तियाज खत्री यांना २१ मेपासून आंतरराष्ट्रीय व्हॉटस्ॲप क्रमांकांवरून सातत्याने धमक्या येत होत्या. याबाबत खत्री यांनी २२ जून रोजी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात मोहम्मद शफीकचा मोबाईल नंबर निष्पन्न झाला होता. मुंबई गुन्हे गुप्तचर पथकाने अचानक छापा टाकून त्याला राहत्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून दोन महागडे मोबाईल आणि एक डायरी जप्त केली आहे.