झोपमोड केल्याने वृद्ध आईचा खून; मुंबईत नराधम मुलाचे कृत्य

ग्रँटरोड येथील घटना; भाजी कापण्याच्या सुरीने पोटावर वार
Youth Kills Mother in Mumbai
सकाळी झोपमोड होते या कारणाने आईचा खून झाल्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहेfile photo

मुंबई : ग्रँटरोड येथे एका ७८ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची तिच्याच मुलाने सुऱ्याने गळ्यावर, पोटावर आणि हातावर वार करुन हत्या केली. रमाबाई नथू पिसाळ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून या हत्येप्रकरणी तिचा मुलगा सुभाष पुजाजी वाघ (६४) याला डी. बी मार्ग पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळच्या कामामुळे झोपमोड होत असल्याने रागाच्या भरात सुभाषने रमाबाई हिची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ग्रँटरोड येथील लॅमिग्टन रोड, चुनाम लेनच्या पंडितालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रुम क्रमांक ११ मध्ये रमाबाई ही वयोवृद्ध महिला राहत होती.

तिच्या पतीने दोन लग्न केले असून दोन्ही पत्नींना प्रत्येकी चार मुले आहेत. तिच्यासोबत सुभाष हा राहत होता, तर तिची मुले त्यांच्या कुटुंबियांसोबत बाजूलाच राहत होते. सकाळी पाणी येत असल्याने रमाबाई ही पहाटे चार वाजता उठून घरातील सर्व काम करत होती. त्यामुळे सुभाषची झोपमोड होत असल्याने त्यांच्यात अनेकदा खटके उडत होते. मंगळवारी सकाळी सात वाजता त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादातून त्याने रमाबाई हिच्या गळ्यावर, पोटावर आणि हाताला भाजी कापण्याच्या सुरीने वार केले होते. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला जवळच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच आरोपी मुलगा सुभाष वाघ याला पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून गुन्ह्यांतील सुरा हस्तगत केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news