

snake rescuer environmentalist raju koli passes away
मालाड - सर्पमित्र राजेंद्र उर्फ राजू बाळाराम कोळी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७. ३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजेंद्र कोळी राजू भाई साप वाला म्हणून उत्तर मुंबईत प्रसिद्ध होते. अंधेरी, वर्सोवा, मढ, मार्वे, मनोरी ते उत्तन भायंदर सह वसई, पालघर बोरिवली, दहिसर या परिसरात ते सर्प मित्र म्हणून ओळखले जात होते तसेच अनेकवेळा कुठेही सर्प आढळले की, त्यांना फोन करून त्याला पकडून सुटका करण्यासाठी बोलवण्यात येत असे. ते स्वखर्चाने असेल त्या ठिकाणावरून फोन आलेल्या ठिकाणी पोहोचून कोणत्याही प्रकारचा सर्प असो त्याची सुटका करायचे.
घोरपडसह इतर जंगली प्राण्यांनाही त्यांनी लोक वस्तीतून पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले होते. बॉलीवूड कलाकार संजय दत्त यांच्या घरातूनही त्यांनी सर्प पकडले होते. ते नि:स्वार्थीपणे अविरत समाज सेवा करत होते. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा रॉक्सन राजेंद्र कोळी, पत्नी व दोन मुली आहेत. तसेच त्यांचा मुलगा रॉक्सन कोळीही त्यांच्या सारखा सर्प मित्र म्हणून ओळखला जातो. दिनांक ९ रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास मढ स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.
सर्प पकडताना अनेकवेळा त्यांना नाग आणि रसेल वायपर सारख्या विषारी सापांनी दंश मारला होता. त्यातूनही ते बचावले होते. ते नेहमी सोबत सर्प दंशाचे औषध, इंजेक्शन ठेवायचे तसेच पोलीस, अग्निशमन दल, वनविभागाच्या मदतीलाही तत्पर असायचे.