MLC Elections : काँग्रेसची मते महायुतीच्या पारड्यात? महायुतीचा दणदणीत विजय
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : Maharashtra MLC Elections : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत महायुतीचाच डंका वाजला.
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेनेच्या भावना गवळी (२४ मते) आणि कृपाल तुमाने (२५ मते) यांचा विजय झाला. शिवसेनेकडे ४६ मते होती. त्यात आणखी ३ मते शिवसेना उमेदवारांना मिळाली.
महायुतीतील भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके आणि सदाभाऊ खोत यांना प्रत्येकी २६ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर यांना २३ मते आणि शिवाजीराव गर्जे यांना २४ मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४२ मते पक्की होती. त्यात त्यांना ५ अतिरिक्त मते मिळाली.
काँग्रेसकडे ३२ मते होती. त्यातील २५ मते प्रज्ञा सातव यांना मिळाली. काँग्रेसची पहिल्या पसंतीची ७ मते फुटल्याचा संशय आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना उमेदवारी दिली होती. उबाठा गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. यात २३ मतांसह नार्वेकर यांचा विजय झाला तर जयंत पाटील यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे उबाठाचे नार्वेकर हे दुसऱ्या पंसतीच्या मतांनी निवडून आले.
