Property Card for Every Flat : प्रत्येक फ्लॅटसाठी स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड, प्रक्रिया सुरू : राज्यातील सात कोटी फ्लॅटधारकांना लाभ

‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ची नवी व्यवस्था : महसूलमंत्री बावनकुळे
Property Card for Every Flat
Published on: 
Updated on: 

मुंबई : राज्यातील प्रत्येक सदनिकेची स्वतंत्र मालमत्तापत्रिका तयार करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या व्यवस्थेमुळे सदनिकेचे क्षेत्रफळ, मालकी हक्क, त्यावरील बोजे आणि कायदेशीर अडचणींची नोंद स्वतंत्रपणे उपलब्ध होणार आहे. राज्यातील सुमारे सात कोटी सदनिकाधारकांना या उपक्रमाचा लाभ होणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (दि. २६) मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली.

यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. नियमावलीचा मसुदा २६ नोव्हेंबरपासून हरकती आणि सूचनांसाठी खुला करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात जमिनीच्या हक्कांची नोंद सातबारा उताऱ्यावर, तर शहरी भूमापन क्षेत्रात मालमत्तापत्रिकेत केली जाते. मात्र, इमारतीतील प्रत्येक सदनिकेच्या स्वतंत्र हक्कांची नोंद करण्यासाठी राज्यभर एकसमान व्यवस्था उपलब्ध नाही. ही उणीव दूर करण्यासाठी नवीन व्यवस्था लागू करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. आलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करून नियमांना अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.

यामध्ये सर्वप्रथम इमारत आणि तिच्या सामायिक जागांची मुख्य नोंद तयार केली जाईल. त्यानंतर प्रत्येक सदनिकेसाठी स्वतंत्र पूरक नोंद करण्यात येईल. शहरी भूमापन क्षेत्रात इमारतीसाठी ‘डी-१’ आणि प्रत्येक सदनिकेसाठी ‘डी-२’ अशी नोंद प्रस्तावित आहे. ग्रामीण, तसेच अन्य क्षेत्रांमध्ये इमारतीसाठी ‘आय-ए’ (गाव नमुना ७-क) आणि सदनिकेसाठी ‘आय-बी’ (गाव नमुना ७-ड) अशी नोंद केली जाणार आहे.

प्रत्येक सदनिकेचा क्रमांक, धारकाचे नाव, मंजूर क्षेत्रफळ, संबंधित हक्क, बोजे आणि इमारतीच्या मंजूर आराखड्यातील क्षेत्रफळ व मोकळी जागा यांचा तपशील मालमत्तापत्रिकेत समाविष्ट असेल. प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख क्रमांकही दिला जाणार आहे. मंजूर बांधकाम आराखडा, संबंधित प्रमाणपत्रे आणि नोंदणीकृत दस्तऐवजांची पडताळणी करून या नोंदी केल्या जातील.

नवीन बांधकाम प्रकल्पांसाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाने दिलेल्या प्रारंभ प्रमाणपत्राच्या आधारे, तर अस्तित्वातील इमारतींसाठी भोगवटा प्रमाणपत्र आणि नोंदणीकृत दस्तऐवजांच्या आधारे नोंदी करण्याचे प्रस्तावित आहे.

अर्ज स्वीकारणे, माहिती संकलित करणे, आवश्यकतेनुसार जागेची पडताळणी, त्रुटींची पूर्तता, नोंदींना मान्यता आणि डिजिटल स्वाक्षरी असलेली मालमत्तापत्रिका वितरित करणे, अशी एकात्मिक डिजिटल व्यवस्था विकसित केली जाणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभागासह संबंधित विभागांमध्येही ठरावीक कालमर्यादेत माहितीची देवाणघेवाण करण्याची तरतूद असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.