मुंबई : मराठी व उर्दू साहित्यिक देवाणघेवाणीसाठी सांस्कृतिक केंद्रे म्हणजे उर्दू घर योजना असून हे उर्दू घर अद्ययावत बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे जाहीर करतानाच उर्दू शाळा, वसतिगृहे वाढविण्यासाठी सकारात्मक असल्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. उर्दू साहित्य अकादमीची नवीन समिती लवकरच गठित करण्याची घोषणाही त्यांनी केली.
महाराष्ट्र उर्दू साहित्य अकदमीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वरळी डोम येथे आयोजित तीन दिवसीय साहित्यिक व सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन मंत्री कोकाटे यांच्या हस्ते झाले. द वर्ल्ड ऑफ उर्दू या प्रदर्शनाचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री अनिस अहमद, आमदार सना मलिक, माजी आमदार झिशान सिद्दिकी, पंजाबी साहित्य अकादमीचे अध्यक्ष मार्क सिंह, औकाफ बोर्डचे अध्यक्ष समीर काझी, पटकथा लेखक जावेद अख्तर, विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, आयुक्त प्रतिभा इंगळे यांच्यासह अधिकारी आणि साहित्यिक उपस्थित होते. यावेळी उर्दू सिखे आणि मराठी शिकूया या दोन पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. दरम्यान, अकादमीने मराठी व उर्दू या दोन्ही भाषांमधील साहित्यिक संवादाची सशक्त परंपरा घडवली, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या.
राज्यातील २५ पेक्षा अधिक जिल्ह्यांत अकादमीने कार्यक्रम घेत ग्रामीण भागातील उप्रेमींपर्यंत साहित्य पोहोचवले आहे. उर्दू ही भारतीय भाषा असून सुमारे सात कोटी लोक ती प्रथम भाषा म्हणून आणि १० कोटी लोक द्वितीय भाषा म्हणून वापरतात. महाराष्ट्रात सात टक्के लोक उर्दू बोलतात, असेही अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.