

मुंबई : यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज असून, या पार्श्वभूमीवर राज्यात बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा शेतकर्यांसाठी उपलब्ध आहे. तसेच, बोगस बियाणे आणि बनावट खते यासारखे प्रकार रोखण्यासाठी धडक कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. शासनाने तयार केलेल्या ‘महाविस्तार’ अॅपचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी वापर करावा आणि ‘साथी’ पोर्टलवरील प्रमाणित बियाणे खरेदी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्य शासनाची खरीप हंगामाची नियोजन बैठक बुधवारी पार पडली. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री, कृषी राज्यमंत्री आणि विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित होते. शासनाचे वरिष्ठ अधिकारी, ‘आयएमडीए’चे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी, केंद्र सरकारचे विविध खात्यांचे अधिकारी हेही उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. या खरीप हंगामाच्या निमित्ताने सुरुवातीला हवामान खात्याने सादरीकरण केले. त्यानुसार राज्याच्या विविध विभागांमध्ये यंदा सरासरीपेक्षा सात ते सतरा टक्क्यांपर्यंत जास्त पाऊस यावर्षी असेल, असा अंदाज आहे. पावसाच्या दोन दिवसांमधील खंडदेखील फार असणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यात खते आणि बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोठेही त्याचा तुटवडा भासणार नाही. गेल्या काही वर्षांचा कल पाहता, कुठले पीक कुठे कमी-अधिक प्रमाणात घेता येईल, याचा विचार करूनच बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. बोगस बियाण्यांचे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राने केंद्र शासनाच्या मंजुरीद्वारे बियाणे साथी पोर्टलवर उपलब्ध केले आहे. यावर्षी जवळपास 70 हजार क्विंटल बियाणे या पोर्टलवर उपलब्ध आहे. त्यात कसलीही बनवेगिरी होण्याची शक्यता नाही. पुढील वर्षीपासून शंभर टक्के बियाणे साथी पोर्टलवर आणण्यात येईल. त्यामुळे बोगस बियाणे हा प्रकार आपण निश्चितपणे बंद करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
खतांच्या लिंकिंगबाबतील कडक निर्णय घेतला जाणार आहे. प्रत्येक खत विक्री दुकानासमोर त्याचा बोर्ड लावला जाणार आहे. खते वगैरे या मोठ्या गोष्टी अनुदानावर दिल्या जातात. त्यामुळे कंपन्यांनी लिंकिंग केल्यास त्यांच्यावर धडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
उत्तम पीक येण्यासाठी कीड व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. मागील काळात पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळाले. हे प्रकार रोखण्यासाठी यावर्षी प्रत्येक तालुक्यात शेतकर्यांसाठी डिजिटल कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून, त्याद्वारे शेतकर्यांचा योग्य मार्गदर्शन केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.