राज्यातील विद्यार्थ्यांचा कल यंदा कौशल्य शिक्षणाऐवजी तंत्रशिक्षणाकडे स्पष्टपणे दिसून येत आहे. पॉलिटेक्निकच्या पहिल्या दोन फेर्यांतच तब्बल 80 हजारांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यावरून तंत्रनिकेतन क्षेत्रातील पदविका शिक्षण घेण्याकडे राज्यातील विद्यार्थ्यांचे अधिक स्वारस्य असल्याचे दिसून आले आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेच्या दोन फेर्यांतच मुदती अगोदरच गुरुवार दुपारपर्यंत 77 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून हे प्रवेश 80 हजारहून अधिक होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पुणे 20 हजार 473, नाशिक 18 हजार 158, त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर 11 हजार 713 तर मुंबई विभागातून 10 हजार 416 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. फक्त दोन फेर्यांमध्ये पॉलिटेक्निक प्रवेश 80 हजारांवर पोहचल्याने तंत्रशिक्षणावरच विद्यार्थ्याचा व पालकांचा अधिक भर असल्याचे आकडेवारी सांगते.
तंत्र शिक्षण पदविका अभ्यासक्रमात यंदाही कॅप्युटर इंजिनिअरींग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स या पारंपरिक शाखांप्रमाणेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इन्फर्मेशन टेक्नोलॉजीसारख्या नव्या शाखांना भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. तर दुसरीकडे कुशल मनुष्यबळ घडत असल्याचे सांगत राज्यात कौशल्य शिक्षणाचा डंका पिटला जात असला तरी आयटीआय खाजगीकरण धोरणाच्या नादात मुळ जुन्या आणि खासगी आयटीआयकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
रोजगाराची संधी म्हणून आयटीआयकडे पाहिले जात असले तरी आयटीआय अभ्यासक्रमासाठी यंदा फक्त पहिल्या दोन फेरीत नोंदणीप्रमाणे फारसा प्रतिसाद मिळाला नाही. एक दिवस मुदतवाढही देण्यात आली. या मुदतवाढीनंतर 63 हजार 177 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. विद्यार्थी नोंदणीच्या आकडेवारीनुसार आयटीआय प्रवेशाचे प्रमाण फारसे समाधानकारक झालेले नाही.
पारंपरिक शिक्षणामुळे सध्या वाढत असलेली बेरोजगारी व नोकरीच्या कमी असलेल्या संधी यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा आयटीआय प्रवेशाकडे कल असल्याचे आत्तपर्यंत पहायला मिळत होते. यंदा मात्र मोजक्याच अभ्यासक्रमांनाच दहावीनंतरच्या विद्यार्थ्यानी पसंती दिली आहे. यंदाही इलेक्ट्रीशियन, ‘फिटर’, ‘वेल्डर’ आदी अभ्यासक्रमांना पसंती दिल्याची माहिती व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीतून दिसून येते.