

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२६ मधील दहावी (एसएससी) व बारावी (एचएससी) पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला. यंदा दोन्ही परीक्षांचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत घसरला असून राज्याचा दहावीचा निकाल २९.५३ टक्के, तर बारावीचा निकाल ३८.७२ टक्के इतका लागला आहे. तर मुंबई विभागाचाही निकाल राज्याच्या सरासरीपेक्षा कमी राहिला असून दहावीचा १७.७३ टक्के आणि बारावीचा निकाल ३३.२२ टक्के निकाल लागला आहे.
दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी राज्यभरातून ५२ हजार ८८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५१ हजार ३१३ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि १५ हजार १५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचा निकाल २७.७५ टक्के, तर मुलींचा ३४.०६ टक्के लागला. गतवर्षी दहावीचा निकाल ३६.४८ टक्के होता. विभागनिहाय निकालात नाशिक विभाग ४१.४५ टक्क्यांसह प्रथम, नागपूर ३९.४२ टक्क्यांसह द्वितीय, तर कोकण विभागाचा १२.२६ टक्के निकाल सर्वात कमी लागला.
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी राज्यभरातून १ लाख ३ हजार ६४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २ हजार ५० विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ३९ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचा निकाल ३६.११ टक्के, तर मुलींचा ४३.८८ टक्के लागला. गतवर्षीच्या ४३.६५ टक्क्यांच्या तुलनेत यंदा निकाल ३८.७२ टक्क्यांवर घसरला आहे.
शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा निकाल ६४.९५ टक्के इतका लागला असून या ४१ हजार ५४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४० हजार ३३ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि २६ हजार ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेत ३१ हजार ९६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
त्यापैकी ३१ हजार ९२३ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ६ हजार ८३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल २१.४० टक्के लागला. वाणिज्य शाखेत २७ हजार ६९५ विद्यार्थ्यांपैकी २७ हजार ६५२ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ६ हजार १९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल २२.४० टक्के राहिला.
एमसीव्हीसी शाखेत २ हजार १४० विद्यार्थ्यांपैकी २ हजार १३७ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ३९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल १८.३४ टक्के लागला. आयटीआय शाखेत ३०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३०५ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल ३०.४९ टक्के लागला आहे.