snakebite disease notification : महाराष्ट्रातील प्रत्‍येक सर्पदंश आता सरकारच्या रडारवर

‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषणा; एएसव्ही साठा, उपचार आणि मृत्यूचीही होणार नोंद
snakebite disease notification
snakebite disease notificationpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : राज्यात सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि कायमस्वरूपी अपंगत्व रोखण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला आता ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये तसेच डॉक्टरांना सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित रुग्णाची नोंद करणे बंधनकारक होणार आहे. सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास त्याची माहितीही तातडीने आरोग्य यंत्रणेला द्यावी लागणार आहे.

या निर्णयामुळे राज्यातील कोणत्या भागात सर्पदंशाच्या घटना अधिक आहेत, कोणत्या हंगामात त्याचे प्रमाण वाढते, किती रुग्णांना सर्पविषबाधा होते, किती जणांना सर्पविष प्रतिबंधक लस द्यावी लागते आणि किती रुग्णांचा मृत्यू होतो, याचा अधिक अचूक आढावा घेता येणार आहे. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उपचारांचे नियोजन करणे शक्य होईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

snakebite disease notification
Mumbai FDA action : उंदीर-झुरळांमुळे दोन हॉटेलांचे परवाने निलंबित

दरम्यान, आरोग्य संस्थेच्या निदर्शनास आलेली किंवा उपचारासाठी दाखल झालेली सर्पदंशाची प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित घटना संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी अथवा जिल्हा शल्यचिकित्सकांना कळवावी लागणार आहे. गंभीर आणि प्राणघातक घटनांची माहिती तातडीने देण्याचे निर्देश आहेत.

उपचाराचीही ‘केस हिस्ट्री’

सर्पदंशाच्या रुग्णाची केवळ नोंद करून प्रशासन थांबणार नाही. दंशाची तारीख आणि ठिकाण, रुग्णाचे वय व लिंग, दंशाची परिस्थिती, विषबाधेची लक्षणे, केलेले उपचार, रुग्णाला अन्य रुग्णालयात पाठविल्यास त्याचा तपशील आणि उपचाराचा परिणाम याची नोंद ठेवावी लागणार आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचीही नोंद करावी लागणार आहे.

राज्य ते जिल्हा नोडल अधिकारी

सर्पदंशाच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर स्वतंत्र नोडल यंत्रणा उभारली जाणार आहे. जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, तर महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय आरोग्य अधिकारी किंवा अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याकडे या व्यवस्थेची जबाबदारी राहणार आहे.

snakebite disease notification
Maharashtra housing land policy : नवीन गृहनिर्माण संस्थांना सरकारी जमिनी

हॉटस्पॉट’ निश्चित होणार?

सर्पदंशाच्या घटनांची संख्या वाढणाऱ्या भागांचा आणि परिस्थितीचा अभ्यासही केला जाणार आहे. घटनास्थळ, हंगाम, ग्रामीण किंवा दुर्गम भाग, दंशाची परिस्थिती आणि इतर संबंधित घटकांची माहिती एकत्रित करून ‘हॉटस्पॉट’ निश्चित करण्यास मदत होणार आहे.

सर्पदंशाच्या रुग्णाला वेळेत योग्य उपचार मिळणे हा जीव वाचविण्याचा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक घटना नोंदविल्यामुळे सर्पदंशाचे प्रमाण, उपचारांची गरज आणि एएसव्हीच्या उपलब्धतेचे अचूक नियोजन करता येईल. सर्पदंशाची प्रत्येक घटना नोंदवूया, वेळेत उपचार देऊया आणि अनमोल जीव वाचवूया, हा शासनाचा प्रयत्न आहे.

प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news